भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ही पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाल्यावर शनिवारी भारतात परतली. यावेळी दिल्ली एअरपोर्टवर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. चाहत्यांचं मिळालेलं प्रेम पाहून विनेश भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. 19 ऑगस्ट सोमवारी संपूर्ण भारतात रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात आहे. विनेश फोगटने सुद्धा तिच्या भावासोबत हा सण साजरा केला. मात्र यावेळी भावाकडून मिळालेली ओवाळणी पाहून विनेशला आश्चर्य वाटले तसेच तिने आनंद सुद्धा व्यक्त केला. सध्या विनेश आणि तिच्या भावाचा रक्षाबंधनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून मेडल न घेता रिकाम्या हातीच भारतात परतावं लागलं. ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठणाऱ्या विनेशला केवळ 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर तिला रौप्य पदक देण्यात यावे यासाठी क्रीडा लवादाकडे याचिका करण्यात आलेली होती. मात्र ही याचिका क्रीडा लवादाने फेटाळली. विनेश ही भारताची पहिली कुस्तीपटू आहे, जिने ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक दिली होती.
पॅरिस ऑलिम्पिकवरून परतल्यावर विनेश तिच्या गावी बलाली येथे पोहोचली. तिथे तिच्या गावाने सुद्धा तिचा मोठा सत्कार केला. विनेशला सख्खा भाऊ नाही तेव्हा ती तिच्या चुलत भावांना रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधते. दरवर्षी प्रमाणे यंदाही सोमवारी रक्षाबंधनाच्या दिवशी तिने आपल्या भावाला राखी बांधली, परंतु भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण तिच्या भावाने ओवाळणीत तिला पाचशे रुपयांच्या नोटांचं बंडल दिलं
सोशल मीडियावर विनेश आणि तिच्या भावाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये विनेशने म्हंटले, 'मी आता जवळपास 30 वर्षांची झाले. मात्र गेल्यावर्षी पर्यंत माझा भाऊ मला ओवाळणी म्हणून 500 रुपये देत होता. त्यानंतर सरळ नोटांचं बंडल... त्याने त्याच्या जीवनभराची सर्व कमाई मला दिली आहे'. असं म्हंटल्यावर विनेश आणि तिचा भाऊ दोन्ही हसायला लागले.
Charkhi Dadri, Haryana: Wrestler Vinesh Phogat celebrates Raksha Bandhan with her brother in their village Balali pic.twitter.com/YgahqHmDPq
— IANS (@ians_india) August 19, 2024
विनेश जेव्हा पॅरिस ऑलिम्पिकवरुन तिच्या गावी बलाली येथे परतली तेव्हा तिच्या चाहत्यांनी आणि पंचायतकडून तिला सन्मानित करण्यात आले. 135 किलोमीटरचं अंतर पूर्ण करण्यासाठी विनेशला तब्बल 13 तास लागले. दिल्लीहून ती मध्यरात्री बलाली गावी पोहोचली. तेव्हा गावकऱ्यांनी तिचे उत्साहात स्वागत केले.