पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत नेमबाज मनु भाकरने संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. मनु भाकरच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचा मोठा वाटा आहे. मनु भाकर जसपाल राणा यांना पित्याप्रमाणे मानते. नुकतंच मनु भाकरने संपादकांशी संवाद साधताना आपला प्रवास उलगडला. यावेळी तिने सांगितलं की, "मी म्हणेन की ते मला वडिलंप्रमाणे आहेत. आणि हा एक विश्वासाचा भाग आहे जो तुम्ही एखाद्यावर टाकता".
"जेव्हा कधी मला मी हे करु शकते की नाही अशी शंका वाटते तेव्हा ते मला फार धैर्य देतात. ते कदाचित मला कानाखाली मारतील आणि म्हणतील तू हे करु शकतेस, यासाठीच तू प्रशिक्षण घेतलं आहेस," अशा भावना मनु भाकरने व्यक्त केल्या. यावेळी जसपाल राणा यांनी तिला रोखलं आणि येथे तू वाद निर्माण करत आहेस असं सांगितलं.
यानंतर मनु भाकरनेही लगेच आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत म्हटलं की, "म्हणजे खऱोखरची कानाखाली नाही, मी फक्त एक शब्द वापरत आहे. ते मला माझ्या मर्यादेपक्षा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. तू यासाठीच ट्रेन झाली असून, तू तुझी सर्वोत्तम कामगिरी देऊ शकतेस असं ते सांगत असतात". यानंतर मनु भाकर आणि जसपाल राणा हसू लागतात.
भाकरसाठी टोकियोमधील अनुभव फार चांगला नव्हता. 10 मीटर एअर पिस्तूल पात्रतेपूर्वी तिचं शस्त्र खराब झालं होतं. यानंतर ती कोणत्याही इव्हेंटमध्ये चांगली कामगिरी करु शकली नव्हती. यावेळी राणा फक्त दूर भारतात टीव्हीवर निराशेने पाहू शकत होते. एक वर्षापूर्वी ते पुन्हा एकत्र आले आणि त्या वेदनादायक आठवणी पुसून टाकण्याचा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली.
"आम्ही 14 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. तेव्हा माझ्या बाजूने तिला फक्त एकच विनंती होती की भुतकाळावर चर्चा करायची नाही. आपम येथून सुरुवात करू आणि पुढे जाऊ. त्यामुळे आम्ही ती गोष्ट कायम ठेवली," असं राणा यांनी सांगितलं.
"माझे काम तिचे संरक्षण करणं आहे. हे फक्त प्रशिक्षणाबद्दल नाही. या स्तरावर, तुम्ही त्यांना ट्रिगर कसा ओढायचा, पाहायचं कसं अशा गोष्टी शिकवू शकत नाही. फक्त त्यांनी संरक्षण देणं आवश्यक आहे," असं त्यांनी सांगितलं.
"कधीकधी कामगिरी, प्रसिद्धी तुमच्या डोक्यात जाते आणि तुम्ही सगळीकडे असता. त्यामुळे, त्यांना जमिनीवर ठेवणं आणि त्यांचं संरक्षण करणे हे आमचे, प्रशिक्षकाचे काम आहे," असं जसपाल राणा म्हणाले.