शारजाह : भारताचा माजी फास्ट बॉलर आरपी सिंग काही दिवसांपूर्वी क्रिकेट मॅचची कॉमेंट्री करताना पाहायला मिळाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा तो क्रिकेटच्या मैदानात परत आला आहे. शारजाहमध्ये सुरु असलेल्या टी-१० लीगमध्ये आरपी सिंग पखतून्सकडून खेळत आहे. राजपूत्स आणि बंगाल टायगर्स या २ टीमविरुद्धच आरपी सिंग मॅच खेळला. यातल्या बंगाल टायगर्सविरुद्धच्या मॅचमध्ये आरपी सिंगनं सर्वोत्तम कामगिरी केली. या मॅचमध्ये आरपी सिंगनं जेसन रॉय आणि लूक राईटची विकेट घेतली. टायगर्सविरुद्ध आरपी सिंगनं १४ रन देऊन २ विकेट घेतल्या. आरपी सिंगच्या कामगिरीमुळे बंगाल टायगर्सनं १० ओव्हरमध्ये ९३/६ एवढा स्कोअर केला. वेस्ट इंडिजच्या आंद्रे फ्लेचरनं १८ बॉलमध्ये ४७ रनची खेळी करून पखतून्सला जिंकवून दिलं.
या मॅचमध्ये आरपी सिंगनं चांगली कामगिरी केली असली तरी तो मैदानातल्या वादामुळेच लक्षात राहिला. आरपी सिंगच्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर ही घटना घडली. आरपी सिंगच्या बॉलिंगवर सुनिल नारायणला बॉल खेळता आला नाही. तरी सुनिल नारायण रन धावला. विकेट कीपर शफिकुल्ला शफीकनं बॉल नॉन-स्ट्रायकर एन्डकडे थ्रो केला. हा थ्रो स्टम्पला लागला.
थ्रो स्टम्पला लागला असला तरी सुनिल नारायणनं क्रिज पार केल्याचं वाटत होतं. रिप्ले बघितले तेव्हा मात्र नारायणचे पाय हवेत असल्याचं दिसत होतं. रिप्ले बघितल्यानंतरही अंपायर थर्ड अंपायरकडे गेले नसल्यामुळे आरपी सिंग भडकला. पहिल्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकायला आरपी सिंगनं नकार दिला.
पख्तून्स टीमचा कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि अंपायरमध्ये बराच वेळ चर्चा झाली. या चर्चेनंतर अखेर आरपी सिंगनं ओव्हरचा शेवटचा बॉल टाकला. जेसन रॉय आणि सुनिल नारायण हा सगळा वाद एका बाजूला उभे राहून बघत होते.
— Mushfiqur Fan (@NaaginDance) November 27, 2018
आरपी सिंगनं त्याची शेवटची मॅच २०१६-१७ साली रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातकडून खेळला. ३२ वर्षांच्या आरपी सिंगनं यावर्षी ४ सप्टेंबरला क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायचा निर्णय घेतला. १३ वर्षांपूर्वी ४ सप्टेंबर २००५ ला मी पहिल्यांदा भारतीय टीमची जर्सी घातली. आता १३ वर्षांनंतर ४ सप्टेंबरलाच मी क्रिकेटमधून संन्यास घेत आहे, असं ट्विट आरपी सिंगनं केलं होतं.
टेस्ट क्रिकेटमध्ये आरपी सिंगनं १४ मॅच खेळल्या. यामध्ये त्यानं ४० विकेटही घेतल्या. टेस्टमध्ये ५९ रन देऊन ५ विकेट (इनिंगमध्ये) ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तर वनडेमध्ये आरपी सिंगनं ५८ मॅचमध्ये ६९ विकेट घेतले. वनडेमध्ये ३५ रन देऊन ४ विकेट ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये आरपीनं १० मॅचमध्ये १५ विकेट घेतल्या. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये १३ रन देऊन ४ विकेट अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.