Sport News : भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये पराभव करत 2-1 ने मालिका खिशात घातली आहे. आफ्रिकेच्या 100 धावांचा पाठलाग करताना भारताने 3 विकेट्स गमावत हे लक्ष्य पूर्ण केलं आहे. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 49 धावा केल्या. श्रेयस अय्यरने षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारताची सलामीची जोडी जास्त वेळ टिकली नाही, कर्णधार शिखर धवन 8 धावांवर धावबाद झाला. इशान किशनला 10 धावांवर इमादने बाद केलं. दुसरीकडे शुभमन गिलने एक बाजू लावून धरली होती, मात्र 49 धावांवर तोही बाद झाला. एका धावेनं त्याचं अर्धशतक हुकलं. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी 19 व्या ओव्हरमध्ये हे आव्हान पूर्ण केलं.
आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आल्यावर त्यांची सुरूवात निराशाजनक झाली. वॉशिंग्टनने डिकॉकला 6 धावांवर माघारी पाठवलं, त्यानंतर सिराजने जानेमन मलानला 15 धावांवर बाद करत सलामीची जोडी माघारी पाठवली. मधल्या फळीतील हेनरिक्स आणि मारक्रमलाही खेळपट्टीवर जास्त वेळ काही तग धरू दिला नाही. शाहबाज आणि सिराजने यांना बाद केलं.
या सामन्यात कर्णधार असलेल्या डेव्हिड मिलरलाही मोठी खेळी करता आली नाही. वॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. क्लासेनने एक बाजू लावून धरली होती परंतू त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. शाहबाज अहमदने खेळपट्टीवर टिकून राहिलेल्या क्लासेनला बाद केलं. त्यानंतर तळाचे फलंदाज कुलदीपच्या फिरकीपुढे जास्त वेळ टिकू शकले नाहीत. अखेर 99 धावांवर आफ्रिकेचा डाव आटोपला.