Indian Cricket Team Jersey: भारतात क्रिकेट या खेळाचे अनेक चाहते आहेत. गल्लीबोळात क्रिकेट खेळताना मुलं तुम्हाला दिसतील. यावरूनच क्रिकेटची लोकप्रियता दिसून येते. आता पुढच्या महिन्यात टी-20 वर्ल्डकपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. त्यामुळे भारताने यंदाचा वर्ल्डकप जिंकावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. असं असताना भारतीय क्रिकेट संघाची (Team India) जर्सी क्रीडा रसिकांचं कायमच लक्ष वेधून घेत असते. टी 20, वनडे आणि टेस्ट अशा तीन फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळलं जातं. टेस्ट क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघ पांढऱ्या रंगाची जर्सी परिधान करते. तर वनडे आणि टी 20 सामन्यांसाठी वेळेनुसार बदल करत संघ जर्सी परिधान करत असतो. टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची नवी जर्सीचं नुकतंच अनावरण करण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या (BCCI Logo) अगदी वर असलेले तीन स्टार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. जर्सीवर हे तीन स्टार का आहेत? माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्यामागचे खास कारण सांगणार आहोत.
तीन स्टार्सचं विशेष महत्त्व आहे
टीम इंडियाच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोच्या वर उजव्या बाजूला 3 स्टार (Three Star On Jersey) बनवलेले आहेत. हे स्टार्स डिझाईन म्हणून बनवलेले नसून या तीन स्टार्सचे महत्त्व आहे. हे स्टार्स भारतीय संघाने मिळवलेल्या काही खास विजयांचे प्रतिनिधित्व करतात. तीन स्टार भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्वचषकाची आठवण करून देतात.
भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय आणि एकदा टी-२० फॉर्मेटमध्ये विश्वचषक जिंकला आहे. अशा परिस्थितीत भारताने आतापर्यंत एकूण 3 वेळा वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर बनवलेल्या बीसीसीआयच्या लोगोच्या अगदी वर हे तीन स्टार बनवण्यात आले आहेत.
तर एका स्टार्सची भर पडेल
ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत एकूण 6 वेळा विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे त्यांच्या जर्सीवर 5 स्टार आहेत. वेस्ट इंडिजच्या जर्सीवर 4 स्टार, भारताच्या जर्सीवर 3 स्टार, पाकिस्तान संघाच्या जर्सीवर 2 स्टार, श्रीलंकेच्या जर्सीवर 2, इंग्लंडच्या जर्सीवर 2 स्टार आहेत. पुढच्या महिन्यात होणारा टी 20 वर्ल्डकप जर भारताने जिंकला तर जर्सीवर 4 स्टार्स दिसतील.