ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा भारताला इशारा

भारतीय क्रिकेट टीम यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे.

Updated: Jan 7, 2020, 11:45 AM IST
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा भारताला इशारा title=

मेलबर्न : भारतीय क्रिकेट टीम यावर्षी डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत ऑस्ट्रेलियात ४ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या सीरिजला ११ महिने असतानाच टीम पेनने भारतीय टीमला इशारा दिला आहे. भारताविरुद्धची ही सीरिज मागच्या सीरिजसारखी असणार नाही. २०१८-१९ सालच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने टेस्ट सीरिज २-१ने जिंकली होती. भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती.

भारताला इशारा देतानाच टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या टीमलाही भारताच्या फास्ट बॉलरपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामधली ही सीरिज अद्भूत असेल. मागच्या सीरिजपेक्षा ही सीरिज वेगळी असेल. दोन्ही टीम या मजबूत आहेत. भारताचे फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियाच्या बॉलरसारखेच घातक आहेत. मागच्यावेळपेक्षा आमची आताची टीम वेगळी आहे. तसंच आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलवरही आमचं लक्ष आहे. दोन्ही टीम फायनलमध्ये जायचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. मागच्या १२ महिन्यांमधली प्रगती बघता आम्ही टॉप २ किंवा टॉप ३-४ मध्ये तरी असू, असं पेन म्हणाला आहे.

न्यूझीलंडचा टेस्ट सीरिजमध्ये ३-०ने पराभव केल्यानंतर पेनने हे वक्तव्य केलं आहे. आमचं लक्ष भारताविरुद्धच्या सीरिजकडे आहे. जर आम्ही बांगलादेशमध्ये चांगलं खेळून विजय मिळवला तर भारताविरुद्धची सीरिज आणखी रोमांचक होईल, असं टीम पेनने सांगितलं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. टीम इंडिया ३६० पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आणि ऑस्ट्रेलिया २९६ पॉईंट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.