भारताने लंका जिंकली! टीम इंडियाचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय, फायनलचं तिकिट निश्चित

Asia Cup 2023 : एशिया कप 2023 च्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर आता टीम इंडियाने श्रीलंकेला त्यांच्याच घरात लोळवलं. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर लंकेची फलंदाजी अक्षरशा ढेपाळली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या श्रीलंकेला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

राजीव कासले | Updated: Sep 12, 2023, 11:08 PM IST
भारताने लंका जिंकली! टीम इंडियाचा श्रीलंकेवर 41 धावांनी विजय, फायनलचं तिकिट निश्चित title=

India Win against Sri Lanka : एशिया कपमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे. एशिया कप 2023 च्या सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला (Pakistan) धुळ चारल्यानंतर आता टीम इंडिया श्रीलंकेला (Team India Beat Sri Lanka) त्यांच्याच घरात लोळवलं. सुपर-4 च्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने लंकेचा 41 धावांनी पराभव केला. भारताच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची फलंदाजी 172 धावांवर ढेपाळली आणि घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणाऱ्या श्रीलंकेला 41 धावांनी पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेला अंतिम फेरी गाठण्यासाठी आता पाकिस्तानविरुद्धचा अखेरचा सामना जिंकावा लागणार आहे.

टीम इंडियाची बल्ले बल्ले
पहिली फलंदाजी करणारी टीम इंडिया अवघ्या 213 धावांवर ऑलआऊट झाली. पण विजयाचं हे माफक आव्हानही श्रीलंकेला पेलवता आलं नाही. त्यांचा संपूर्ण संघ 172 धावांवर गारद झाला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या लंकेला तिसऱ्यात षटकात जसप्रीत बुमराने पहिला धक्का दिला. सलामीला आलेला निसांका सहा धावा करुन बाद झाला. तर सातव्या षटकात 15 धावांवर खेळणाऱ्या मेंडिसला बुमराने बाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर ठराविक अंतराने लंकेचे फलंदाज बाद होत गेले. वेल्लालागने एकाकी झुंज देत नाबाद 42 धावा केल्या, पण त्याची झुंज अपयशी ठरली. 

भारताच्या गोलंदाजीचा हिरो ठरतो तो चायनामन कुलदीप यादव. पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट घेणाऱ्या कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. बुमराह आणि जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

भारताची फलंदाजी
पाकिस्तानविरुद्ध 356 धावांचा डोंगर रचणाऱ्या टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात मात्र अवघ्या सवादोनशे धावांचा टप्पा गाठता आला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय यावेळी यशस्वी ठरला नाही. संपूर्ण संघ लंकेच्या फिरकिच्या जाळ्यात अडकला. श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाला 213 धावात गारद केलं. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 80 धावांची पार्टनरशिप केली. पण 80 धावांवर असताना भारताला पहिला धक्का बसला. शुभमन गिल 19 धावा करुन बाद झाला. 

कर्णधार रोहित शर्माने 48 धावात 53 धावा केल्या, पण त्याच्याव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विराट कोहली 3 धावा करुन बाद झाला. तर केएल राहुल 39 धावा करुन पॅव्हेलिअनमध्ये परतला. ईशान किशननेही 33 धावांची खेळी केली. अष्टपैली हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा तर दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पांड्या  5 तर जडेजा 4 धावा करुन बाद झाले. त्यानंतर बुमराह, कुलदीप यादव आणि सिराज केवळ हजेरी लावून परतले. अक्षर पटेलने तळाला एकाकी झुंज देत 26 धावा केल्या.

20 वर्षांचा गोलंदाज लंकेचा हिरो
श्रीलंकेच्या गोलंदाजीचा हिरो ठरला तो अवघ्या 20 वर्षांचा फिरकीपटू डुनिथ वेललेज. वेललेजने रोहित, विराट, ईशान आणि राहुल या भारताच्या स्टार फलंदाजांची विकेट घेतली. अवघ्या चाळीस धावा देत वेलालंगने पाच विकेट घेतल्या. तर असलंकाने चार विकेट घेत त्याला मोलाची साथ दिली. 

पण लंकेच्या गोलंदाजांच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फिरवलं. भारताच्या गोलंदाजीसमोर विजयाचं माफक आव्हानही श्रीलंकेला पूर्ण करता आलं नाही. आता फायनल गाठवण्यासाठी श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्धचा शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.