Asia Cup 2023 India Vs Sri Lanka: भारताची आशिया चषक स्पर्धेमधील कामगिरी फारच चढ उतार असलेली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध 'सुपर-4'च्या सामन्यात दमदार कामगिरी करणारे भारतीय फलंदाज पाकिस्तानविरुद्धच्या साखळी फेरीतील सामन्यात ढेपाळले होते. दुसरीकडे नेपाळच्या फलंदाजांनीही साखळी फेरीत भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला होता. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात भारतीय फलंदाजांनी सगळा वचपा काढला. मात्र दुसऱ्याच दिवशी भारतीय संघातील फलंदाजांनी पुन्हा चाहत्यांची चिंता विश्वचषक स्पर्धेआधीच वाढवली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात हे असं काही होईल आणि 24 तासांमध्ये एकदम विरुद्ध चित्र दिसेल असं भारतीय चाहत्यांना वाटलं नव्हतं.
आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवड करताना दुखापतीमधून सावरलेल्या खेळाडूंनाही संघात स्थान देण्यात आलं. या मालिकेआधी अनेक दिग्गज खेळाडू जायबंदी झाल्याने मैदानापासून दूर होते. त्यांना या स्पर्धेमध्ये स्थान देण्यात आलं. खरं तर आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये भारतीय फलंदाजीवर शंका घेता येईल अशी कामगिरी फलंदाजांनी केली. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. मधल्या फळीत फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारतीय डावाला आकार दिला. या दोघांच्या खेळीमुळे भारताला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यामध्ये सर्व भारतीय फलंदाजांना वेगवान गोलंदाजांनीच तंबूत धाडलं. असा पराक्रम भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी गोलंदाजींनी पाहिल्यांदाच करुन दाखवला होता. पाकिस्तानविरुद्ध जे घडलं त्याची पुनरावृत्ती आज श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात घडली. साखळी फेरीमध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडू पाकिस्तानच्या वेगवान गोलंजादांसमोर बाद झाले होते. शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांनी भारताचे 10 खेळाडू बाद केले.
आज श्रीलंका आणि भारतादरम्यान झालेल्या सुपर-4 सामन्यामध्येही भारतीय फलंदाजांबरोबर असाच काहीसा प्रकार घडला. फक्त यावेळेस वेगवान गोलंदाजांऐवजी भारतीय फलंदाजांना फिरकी गोलंदाजांनी गुडाळलं. भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांसमोर अगदी लोटांगण घातल्याचं पहायला मिळालं. भारताच्या सर्वच फलंदाजांनी एकसारखीच चूक केली. वळणारे चेंडू खेळून काढण्याच्या नादात भारतीय फलंदाज एकतर यष्टीचित झाले नाहीतर सोपे झेल देऊन बसले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे 3 गोलंदाजांनीच भारतीय फलंदाजीला सुरुंग लावले तसाच प्रकार आज घडला आणि 3 फिरकी गोलंदाजांनाही भारतीय फलंदाजांना 49.1 ओव्हरमध्ये तंबूचा रस्ता दाखवला. डुनिथ वेललेज, चरिथ असालंका आणि महीश तीक्ष्णा या तिघांच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं की काय असा प्रश्न पडण्याइतकी वाईट फलंदाजी भारतीय संघाने केली.
नक्की वाचा >> 20 वर्षांच्या पोरासमोर भारतीय फलंदाजांना उभंही राहता येत नव्हतं! 5 जणांना फिरकीत गुंडाळणारा 'तो' कोण?
20 वर्षीय डुनिथ वेललेजने भारतीय संघाविरुद्ध भन्नाट गोलंदाजी करताना आपल्या करिअरमधील सर्वोत्तम स्पेल टाकला. आशिया चषक स्पर्धेतील या सामन्यामधील भारताच्या पहिल्या चारही विकेट्स डुनिथ वेललेजनेच घेतल्या. शुभन गिल आणि रोहित शर्माला डुनिथ वेललेजने क्लिन बोल्ड केलं. तर विराट कोहली, हार्दिक पंड्या त्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाले. के. एल. राहुलला तर डुनिथ वेललेजने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. डुनिथ वेललेजने 10 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन भारताच्या 5 फलंदाजांना बाद केलं. मागील सामन्यामध्ये पाकिस्तानच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजीसमोर खणखणीत शतकं झळकावणारे विराट कोहली आणि के. एल. राहुल हे सुद्धा या 5 जणांमध्ये होते.
दुसऱ्या बाजूने चरिथ असालंकानेही आपल्या फिरकीमध्ये भारतीय फलंदाजांना गुंडळाललं. त्याने चांगली फलंदाजी करत असलेल्या इशान किशनला बाद केलं. रविंद्र जडेजालाही विकेटकीपर कुशल मेंडिसकरवी अवघ्या 4 धावांवर झेलबाद केलं. जसप्रीत बुमरालाही असालंकाने 5 धावांवर असताना बोल्ड केलं. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने कुलदीप यादवला झेलबाद केलं. अक्सर पटेलला तीक्ष्णाने बाद केलं.
नक्की पाहा >> सिक्सरचा नवा किंग रोहित शर्मा! शाहिद आफ्रिदीचा Lifetime रेकॉर्ड मोडला
भारताच्या 10 ही विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेण्याची ही एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली आहे. श्रीलंकन गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीमुळे एक लाजिरवाणा आणि नकोसा विक्रम भारताच्या नावावर झाला आहे. असालंकाने 9 ओव्हरमध्ये 18 धावा देऊन 4 गडी बाद केले. तर तीक्ष्णाने 9.1 ओव्हरमध्ये 41 धावा देत एका गाड्याला बाद केलं.