IND vs SL: आज भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना रंगला होता. सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून आणि गौतम गंभीर कोच म्हणून टीम इंडियाची ही पहिलीच सिरीज आहे. या सिरीजमधील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला आहे. पहिला टी-20 सामना भारताने 43 रन्सने जिंकला आहे. त्यामुळे या सिरीजमध्ये भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी 214 धावांचं लक्ष्य होतं. परंतु श्रीलंकेची संपूर्ण टीम 19.2 ओव्हर्समध्ये 170 धावांपर्यंत मजल मारू शकली. यावेळी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या टीमने 14 षटकांत 2 बाद 140 धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंका सामना जिंकू शकेल असं वाटत होते, मात्र 15व्या षटकात अक्षर पटेलने पथुम निसांका आणि कुसल परेरा यांना बाद करत सामन्याचं चित्र पालटलं. यानंतर श्रीलंकेच्या टीम गडगडली.
टॉस हरल्यानंतर टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीचं निमंत्रण मिळालं. यावेळी टीम इंडियाच्या ओपनर्सने चांगली कामगिरी केली. यशस्वी जयस्वालने 40 तर शुभमन गिलने 34 रन्सची खेळी केली. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने कॅप्टन्स इनिंग खेळत 58 रन्स केले. याशिवाय अवघ्या एका रन्ससाठी ऋषभ पंतचं अर्धशतक हुकलं. पंत 49 रन्सवर बाद झाला. याशिवाय हार्दिक पंड्या, रियान पराग आणि रिंकू सिंहला चांगला खेळ करता आला नाही. अखेरीस 20 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 213 रन्स केले.
कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची ही पहिली सिरीज आहे. यावेळी श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच सामन्यात सूर्यकुमार यादवची बॅट तळपली. सूर्याने तुफानी फलंदाजी करत अर्धशतक झळकावलं. सूर्याने 26 बॉल्समध्ये 58 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीत 8 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे.
शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, रियान पराग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, ऋषभ पंत (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिश तिक्षाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.