लंडन : इंग्लंडमध्ये सध्या प्रचंड उष्णता आहे. या उष्णत वातावरणात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियाचा स्टार बॅट्समन चेतेश्वर पुजाराने (cheteshwar pujara) धमाका केला. पुजाराने काउंटी चॅम्पियनशिपमध्ये मिडलसेक्सविरुद्ध ससेक्ससाठी शानदार द्विशतक झळकावलं. विशेष म्हणजे पुजाराने 8 तासात द्विशतक झळकावलं. पुजाराचं या मोसमातील हे तिसरं द्विशतक ठरलं. (team india test team star batsman cheteshwar pujara hit 3rd double century for sussex in county)
मिडलसेक्सविरुद्ध ससेक्सचे नेतृत्व करताना पुजाराने 368 बॉलमध्ये द्विशतक पूर्ण केलं. यादरम्यान पुजाराने 19 चौकार आणि 2 षटकार ठोकले. पुजाराच्या खेळीच्या जोरावर टीमला उभारी मिळाली. ससेक्सला शेवटचा धक्का पुजाराच्या रूपाने 523 धावांवर बसला. पुजारा 403 चेंडूत 231 धावा करून बाद झाला.
पुजारा ससेक्सकडून 118 वर्षांनंतर एकाच काऊंटी हंगामात 3 द्विशतकं झळकावणारा पहिला खेळाडू ठरला. पुजारा गेल्या काही सामन्यांपासून धमाकेदार कामगिरी करतोय. भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीत त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.
मिडलसेक्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी टॉम हेन्सला दुखापत झाली. त्यानंतर पुजाराला ससेक्सचा कर्णधार बनवण्यात आलं. लिसेस्टरशायर विरुद्धच्या मागील सामन्यात हेन्सला हाताला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याला 5 ते 6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. मिडलसेक्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ससेक्सने 35 षटकांत 99 धावांत 2 विकेट्स गमावले.
यानंतर पुजाराने टॉमसोबत 219 धावांची शानदार भागीदारी केली. पुजाराने यापूर्वी डर्बीशायर आणि डरहमविरुद्ध द्विशतक ठोकलं होतं. पुजारासाठी ससेक्सकडून खेळण्याचा हा पहिलाच काऊंटी हंगाम आहे. पुजाराने या पहिल्याच मोसमात धमाका केला.
एजबॅस्टन कसोटीपूर्वी पुजाराने मिडलसेक्सविरुद्ध नाबाद 170, डरहमविरुद्ध नाबाद 203, वूस्टरशायरविरुद्ध 109, काऊंटीमध्ये डर्बीशायरविरुद्ध नाबाद 201 धावा केल्या होत्या. पुजाराने मेमध्ये मिडलसेक्सविरुद्ध नॉट आऊट 170 धावांची खेळी करून टीम इंडियात कमबॅक केलं होतं.