Preveen Kumar Car Accident: Team India तील खेळाडू ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातातून सावरत असतानाच आणखी एका खेळाडूचा भीषण अपघात झाल्याच्या वृत्तानं क्रिकेट जगताला हादरा बसला आहे. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये त्याच्या कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. सुदैवानं हा खेळाडू यामध्ये थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येत आहे. एका भयंकर अपघातातून बचावलेला हा खेळाडू आहे, प्रवीण कुमाक.
सूत्रांच्या माहितीनुसार प्रवीणच्या कारला एका कँटर ट्रकनं धडक दिली. अपघातावेळी प्रवीण आणि त्याचा मुलगा कारमधून प्रवास करत होते. अपघात इतका मोठा होता की, त्या क्षणी तातडीनं स्थानिकांनी एकत्र येत ट्रक चालकाला पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
बागपत रोडनजीक असणाऱ्या मुलतान नगर येथे राहणारा प्रवीण त्याच्या मुलासह मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्याच्या डिफेंडर कारं पांडव नगरच्या दिशेनं निघाला होता. पण, आयुक्त निवासाजवळ पोहोचताच समोरून येणाऱ्या वेगवान कँटर ट्रकनं त्याच्या कारला धडक दिली. यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं, पण प्रवीण आणि त्याला मुलगा मात्र सुखरुप असल्याचं म्हटलं गेलं.
आपल्या फिरकी गोलंदाजीनं विरोधी संघातील खेळाडूंना घाम फोडणाऱ्या प्रवीण कुमारनं भारतीय संघासाठी कसोटी, टी20 आणि एकदिवसीय अशा तिनही प्रकारातील खेळात योगदान दिलं. त्यानं भारतीय संघातून खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये 6 सामन्यांत 27 गडी, 68 एकदिवसीय सामन्यांत 77 गडी आणि 10 टी20 सामन्यांत 8 गडी बाद केले. 2007 मध्ये क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या प्रवीणची क्रिकेट कारकिर्द अवघ्या 26 वर्षांच्या वयातच धोक्यात आली होती. 2012 नंतर तो भारतीय संघाच्या वतीनं पुन्हा मैदानात उतरलाच नाही. असं असलं तरीही भारतीय क्रिकेट संघातील त्याचं योगदान कोणीही विसरणार नाही हेच खरं.
2022 या वर्षअखेरीस भारतीय क्रिकेट संघातील युवा खेळाडू ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपगात झाला होता. या अपघातामध्ये त्याच्या कारनं पेट घेतल्यामुळं ऋषभ गंभीररित्या जखमी झाला होता. समयसूचकतेमुळं कारमधून बाहेर पडलेल्या ऋषभला वेळीच स्थानिकांनी मदत करत त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. जिथं डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतर तो या अपघातातून सावरताना दिसला. ऋषभ अद्यापही दुखापतींतून पूर्णपणे सावरला नसला तरीही त्याच्या सकारात्मक बदल नक्कीच दिसत आहेत. त्यामुळं आता क्रिकेटप्रेमींना तो नेमका मैदानात कधी परतणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.