India vs New Zealand ODI Series: टी20 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय ए संघ आणि न्यूझीलंड ए संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारताचा धडाकेबाज फलंदाज संजू सॅमसनवर या संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या संघात सध्या फॉर्मात असलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. पण एका खेळाडूने टीम इंडियात अचानक एन्ट्री घेतली आहे. या खेळाडूने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून दिलाय.
टीम इंडियात या खेळाडूची एन्ट्री
भारतीय संघाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा राज अंगद बावाला भारतीय संधी देण्यात आली आहे. राज बावा भेदक गोलंदाजी आणि धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. चंदीगडसाठी राज बावा केवळ दोन रणजी सामने खेळला आहे. चेतना शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय निवड समिती हार्दिक पांड्याला पर्याय शोधत आहे. पांड्याची उणीव भासू नये यासाठी निवड समितीकडून प्रयोग केला जात आहे.
याआधी शिवम दुबे आणि विजय शंकर सारख्या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्यात आली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ते स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे निवड समिती आता नव्या अष्टपैलू खेळाडूंना संधी देण्याच्या प्रयत्नात आहे. भारतीय संघात स्पीन गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा पर्याय उपलब्ध आहे. पण मधल्या फळीत चांगल्या फलंदाजीबरोबर वेगवान गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची संख्या कमी आहे.
भारत ए आणि न्यूझीलंड ए संघात तीन एकदिवसीय सामने
भारतीय ए आणि न्यूझीलंड ए संघात 3 एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. यातला पहिल सामना 22 सप्टेंबरला खेळला जाणार असून 25 आणि 27 सप्टेंबरला दुसरा आणि तिसरा सामना रंगेल. तीनही सामने चेन्नईत खेळवले जाणार आहेत. दुलीप ट्रॉफीत दमदार कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉलाही या संघात स्थान देण्यात आलं आहे. या मालिकेत निवड समितीचं मुख्य लक्ष असेल तर राज अंगद बावाच्या कामगिरीवर.
भारत ए टीम:
संजू सैमसन (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर) पृथ्वी शॉ, अभिमन्यु ईश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बावा