T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपला आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. येत्या 2 दोन तारखेपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरवात होईल. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून पाच संघांचे प्रत्येकी चार ग्रुप तयार करण्यात आले आहे. टीम इंडियाचा (Team India) ग्रुप ए मध्ये समावेश असून पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे. टीम इंडियाच्या मिशन टी20 वर्ल्ड कपला येत्या 5 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळवला जाणार आहे. यासाठी टीम इंडिया न्यूयॉर्कमध्ये (New York) दाखल झाली असून सरावही सुरु केला आहे.
टीम इंडियाच्या खेळाडूंनी सराव शिबिरात फलंदाजी आणि गोलंदाजीचा जोरदार सराव केला. यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियातले खेळाडू न्यूयॉर्कमध्ये खुश नाहीत.
टीम इंडिया का खूश नाही?
टीम इंडियाच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण म्हणजे सराव करण्यासाठी टीम इंडियाला पुरेशा सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. आयसीसीने भारतीय संघाच्या राहाण्याची व्यवस्था नासाऊ काऊंटीतल्या गार्डन सिटी व्हिलेजमध्ये केलेली आहे. तिथून जवळच असलेल्या कँटिएग पार्कमध्ये टीम इंडिया सराव करते. बुधवारी कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघ या ठिकाणी सरावासाठी दाखल झाला. या ठिकाणी टीम इंडियाने तीन तास सराव केला. पण ज्या सुविधा संघाला देण्यात आल्या होत्या, त्या तात्पुरत्या स्वरुपात होत्या. म्हणजे सरावाच्या काही दिवस आधीच खेळपट्टी आणि इतर सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.
याच खेळपट्टीवर सराव सामना
1 जूनला टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना याच कॅंटिएग पार्कवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाला याच सुविधा वापराव्या लागणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया न्यूयॉर्कमधल्या नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. तर याच स्टेडिअमवर पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्धचाही सामना खेळवला जाणार आहे. यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे या स्टेडिअमवर सरावाची सुविधाच नाही. केवळ सामने खेळवण्यसाठी हे स्टेडिअम तयार करण्यात आलं आहे.
टीम इंडियाचा कॅनडाविरुद्धचा ग्रुपमधला शेवटचा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार आहे. ग्रुप सामने संपल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजला रवाना होईल. याठिकाणी सुपर 8 चे सामने खेळवले जाणार आहेत.
टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान