T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत आता सेमीफायनलची (Semi Final) चुरस रंगणार असून भारत - इंग्लंड (India vs England) आणि न्यूझीलंड - पाकिस्तान (New Zealand vs Pakistan) या चार संघांमध्ये सेमीफायनलची लढत होणार आहे. फायनलला कोणत्या दोन टीम पोहोचणार याची उत्सुकता असतानाच क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमची कामगिरी अगदीच सुमार झाली आहे. स्पर्धेतल्या एकाही सामन्यात बाबरला मोठी कामगिरी करता आलेली नाही. याच दरम्यान बाबर आझमबाबत मोठी बातमी समोर येत आहे. बाबर आझम कराची किंग्सच्या (Karachi Kings) कर्णधारपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर तो टीमही सोडण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानी मीडियाने (Pakistan Media) दिलेल्या माहितीनुसार बाबर आझम आणि कराची किंग्समधले संबंध तणावपूर्ण बनले आहेत. बाबर आझमने कराची किंग्सच्या टीम मॅनेजमेंटलाही तसे संकेत दिले आहेत. पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) गेल्या काही सीझनमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली कराची किंग्जची समाधानकारक कामगिरी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार कराची किंग्जचा संचालक वसीम आक्रमबरोबरही (Wasim Akram) बाबर आझमचं भांडण झालं होतं.
गेल्या हंगामात तर कराची किंग्जने 10 पैकी तब्बल 8 सामने गमावले होते. पॉईंट टेबलमध्ये कराची किंग्ज सर्वात शेवटच्या स्थानावर होती. त्यामुळे कर्णधार बाबर आझमच्या मैदानावरच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. असं असलं तरी पाकिस्तान सुपर लीगमध्ये सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ज बाबर आझमच्याच नावावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या 68 सामन्यात बाबर आझमने 2413 धावा केल्या आहेत.
टी20 वर्ल्ड कपमध्ये खराब फॉर्म
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आझमची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पाच सामन्यात बाबरने 0, 4, 4, 6, 25 धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला असला तरी बाबर आझमचा फॉर्म टीमसमोर डोकेदुखी ठरला आहे.