T20 World Cup Australia Captain Warning To Team India: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 च्या फेरीत आज भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. एकीकडे भारतीय संघाने आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाचा दुबळ्या अफगाणिस्तानने पराभव करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानकडून पराभवाची नामुष्की झेलावी लागल्याने त्यांच्यासाठी भारताविरुद्धचा सामना करो या मरोचा असणार आहे. तर दुसरीकडे भारतालाही हा सामना जिंकून सेमीफायनलचं तिकीट निश्चित करायचं आहे. असं असतानाच अफगाणिस्तानने धूळ चारल्यानंतरही ऑस्ट्रेलियन कर्णधाराची खुमखूमी गेलेली नाही असेच मिलेच मार्शच्या एका विधानावरुन स्पष्ट होतं आहे. अफगाणिस्तानसारख्या संघाकडून पराभूत झाल्यानंतर मिलेच मार्शने थेट भारताला इशारा दिला आहे.
रविवारी झालेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 149 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 20 ओव्हरही खेळू शकला नाही. अफगाणिस्तानच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी लोटांगण घातलं. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियन संघाला 19.2 ओव्हरमध्ये 127 वर तंबूत धाडलं आणि हा सामना 21 धावांनी जिंकला.
नक्की वाचा > ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेमका किती मोठा विजय मिळवल्यास भारत सेमीफायनलला जाऊ शकतो?
या सामन्यानंतर बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने चित्र अगदी स्पष्ट झालं आहे असं म्हटलं आहे. आता आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला पराभूत करायचं आहे, असं मार्श म्हणाला आहे.
"सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता आम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. आम्हाला आता कोणत्या संघाविरुद्ध खेळायचं आहे यापेक्षा जो सामना होणार तो काहीही झालं तरी जिंकायचाच आहे, असं समीकरण आहे. त्यामुळे पुढील सामन्यात आमच्या समोर असलेल्या (भारतीय) संघापेक्षा पराभूत करायला उत्तम संघ या स्पर्धेत नाही. आज अफगाणिस्तानने जो खेळ केला त्याचं सारं श्रेय त्यांना दिलं पाहिजे. आम्हाला आता या पराभवानंतर पुढे सरकायला हवं," असं मार्शने सामन्यानंतर म्हटलं. अफगाणिस्तानचा संघ आमच्यापेक्षा उत्तम क्रिकेट खेळल्याचं मार्शने मान्य केलं.
नक्की पाहा >> टीम इंडियाचं मंत्रिमंडळं असतं तर... जडेजा कृषीमंत्री! कोहली, पंतकडे 'हे' मंत्रालय; पाहा Photos
भारताने सुपर 8 मध्ये पहिले दोन सामने जिंकले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात भारताला अगदी विजय मिळवता आला नाही असं म्हटलं तरी मोठा पराभव टाळावा लागणार आहे. भारताचा मोठ्या फरकाने पराभव झाला नाही तर भारत नेट रन रेटच्या जोरावर अव्वल 2 मध्ये कायम राहील. आजचा सामना ऑस्ट्रेलियन संघ जिंकला आणि दुसरीकडे अफगाणिस्तानने बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर भारत या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल.