T20 World Cup India will be eliminated If...: भारतीय संघ आज टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 फेरीतील आपला शेवटचा सामना खेळणार आहे. भारताला सेमीफायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीने आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे अत्यावश्यक आहे. भारताचा आजचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारत आज सेमीफायलनमध्ये प्रवेश करु शकतो त्याचप्रमाणे भारत थेट या स्पर्धेबाहेर फेकला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सध्या भारतीय संघ ग्रुप 1 मध्ये आहे. भारतीय संघ सध्या अव्वल स्थानी असला तरी या गटातून तेच अव्वल दोनमध्ये असतील असं आता तरी सांगता येत नाही. भारत कशाप्रकारे या स्पर्धेतून बाहेर पडण्याचा धोका आहे याचं गणित समजून घेऊयात...
भारताने सुपर 8 मध्ये पहिले दोन सामने जिंकले आहेत. आज होणाऱ्या सामन्यात भारताला अगदी विजय मिळवता आला नाही असं म्हटलं तरी मोठा पराभव टाळावा लागणार आहे. भारताचा मोठ्या फरकाने पराभव झाला नाही तर भारत नेट रन रेटच्या जोरावर अव्वल 2 मध्ये कायम राहील. आजचा सामना ऑस्ट्रेलियन संघ जिंकला आणि दुसरीकडे अफगाणिस्तानने बांगलादेशला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर भारत या स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. आता हा मोठा फरक नेमका किती हे जाणून घेऊयात.
आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 41 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभूत केलं तसेच या गटातील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला 81 धावांनी पराभूत केल्यास भारत या स्पर्धेतून बाहेर पडले.
भारताने सुपर 8 मध्ये अफगाणिस्तान आणि बांगलादेशला पराभूत केलं आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघाने बांगलादेशला पराभूत केलं असून रविवारी (भारतीय वेळेनुसार) झालेल्या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानने पराभूत केलं आहे.
अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना भारताने पराभूत केलं आहे. मात्र त्यानंतरच्या सामन्यात टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा धक्का ऑस्ट्रेलिया देत अफगाणिस्तानच्या संघाने स्पर्धेतील त्यांचं आव्हान कायम राखलं आहे. बांगलादेशने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं आहे. मात्र असं असलं तरी आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 55 किंवा अधिक धावांची पराभव झाला आणि अफगाणिस्तानविरुद्धचा सामना 31 किंवा अधिक धावांनी जिंकला तर बांगलादेशचा संघही सेमीफायनलसाठी पात्र ठरु शकतो. अशा स्थितीमध्ये भारत आणि बांगलादेश सेमीफायनलला जाईल.