टीम इंडियाने 10 वर्षात गमावली आयसीसीची 10 जेतेपदं, आता रोहितसेना इतिहास बदलणार?

IND vs SA Final : टीम इंडियाने 2013 मध्य आयसीसी चॅम्पियन ट्ऱॉफी जिंकली होती. पण त्यानंतर गेल्या 10 वर्षात टीम इंडिया 10 जेतेपदं गमावली आहे. यातल्या पाच स्पर्धांमध्ये टीम इंडिया फायनलपर्यंत पोहोचली होती

राजीव कासले | Updated: Jun 28, 2024, 06:06 PM IST
टीम इंडियाने 10 वर्षात गमावली आयसीसीची 10 जेतेपदं, आता रोहितसेना इतिहास बदलणार? title=

T20 World Cup IND vs SA Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात (T20 World Cup Final) धडक मारली आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी (Team India vs South Africa Final) होणार असून 29 जूनला बारबाडोसमध्ये अंतिम सामना खेळवला जाणार आहे. गेल्या दहा वर्षातला इतिहास बदलण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. गेल्या दहा वर्षात टीम इंडिया आयसीसीची एकही स्पर्धा (ICC) जिंकू शकलेली नाही. गेल्या दहा वर्षात टीम इंडियाने पाचवेळा आयसीसी स्पर्धांच्या अंतिम सामन्यात धडक मारली. पण पाचही वेळा टीम इंडियाच्या हाती निराशा आली.

कधी जिंकली शेवटची आयसीसी स्पर्धा?
टीम इंडिया शेवटची 2013 मध्ये आयसीसी स्पर्धा जिंकली होती. 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला होता. त्याआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. सलग दोन जेतेपदामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्येही जोश होता. पण त्यानंतर गेल्या दहा वर्षात टीम इंडियाला आयसीसी जेतेपदासाठी केवळ वाट पाहावी लागत आहे.

4 वेळा टी20 वर्ल्ड कपमध्ये पराभव
गेल्या दहा वर्षातील टीम इंडियाची कामगिरी पाहिली तर चार वेळा टीम इंडियाने जेतेपदाचा दावा सांगितला. 2014 मध्ये टीम इंडियाला श्रीलंकेकडून 6 विकेटने पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर 2016 आणि 2022 मध्ये टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली होती. 

3 वेळा ODI विश्व चषकात पराभव
2013 चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपदानंतर 2015 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाकडून मोठी अपेक्षा होती. ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थानी राहात टीम इंडियान सेमीफायनल गाठली. पण ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि टीम इंडिया बाहेर गेली. 2019 एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेतही टीम इंडियाने सेमीफायनलपर्यंत धडक मारली. पण यावेळी न्यूझीलंडने बाहेरचा रस्ता दाखवला. 2023  एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये तर टीम इंडियाने अपराजित राहात फायनल गाठली. पण पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलं.

2 वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पराभव
आतापर्यंत दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवण्यात आली आहे. दोन्ही वेळी टीम इंडिया अंतिम सामन्यात धडक मारली. 2021 मध्ये न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 विकेटने पराभव केला. तर 2023 मध्ये पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तब्बल 209 धावांनी टीम इंडियाचा धुव्वा उडवला.

2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना
2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचं प्रदर्शन दृष्ट लागण्यासारखं होतं. ग्रुप स्टेजमध्ये दमदार कामगिरी करत टीम इंडियाने नॉकआऊट स्टेजपर्यंत धडक मारली. पण अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून टीम इंडियाला 180 धावांनी पराभव पत्करावा लागला.

गेल्या दहा वर्षातील टीम इंडियाची आयसीसी स्पर्धांमधली कामगिरी

2014 -  टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध पराभव

2015 - ODI वर्ल्ड कपच्या सेमीफाइनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव

2016 - टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये वेस्टइंडिजकडून पराभव

2017- चॅम्पियन्स ट्ऱॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभव

2019- ODI वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव

2021- वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव

2021- टी20 वर्ल्ड कपच्या ग्रुप स्टेजमधून बाहेर

2022- टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव

2023- वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव

2023- ODI वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिाने केली मात