सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला, काकांचा मृत्यू

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आहे. 

Updated: Aug 29, 2020, 07:34 PM IST
सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला, काकांचा मृत्यू title=

चंडीगढ : भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये सुरेश रैनाच्या काकांचा मृत्यू झाला आहे, तर कुटुंबातले चौघे जखमी झाले आहेत. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यामध्ये सरकारी कंत्राटदार असणाऱ्या अशोक कुमार यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. १९ ऑगस्ट आणि २० ऑगस्टच्या रात्री पंजाबच्या थरियाल गावामध्ये ही घटना घडली.

अशोक कुमार यांचे मोठे भाऊ असलेल्या श्याम लाल यांनी सुरेश रैना आपला नातेवाईक असल्याचं सांगितलं आहे. सुरेश रैना गावामध्ये येणार असल्याचंही श्याम लाल म्हणाले आहेत. याआधी हल्ला झालेलं कुटुंब रैनाचं नातेवाईक आहे का, याबाबत आम्हाला माहिती नसल्याची प्रतिक्रिया पोलिसांनी दिली होती. 

घर लुटण्याच्या उद्देशाने एक टोळी अशोक कुमार यांच्या घरात घुसली होती. या टोळीने अशोक कुमार आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. दरोडेखोर घरात घुसले तेव्हा कुटुंब गच्चीमध्ये झोपलं होतं. हल्ल्यामध्ये अशोक कुमार यांच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे त्यांच्या त्याच दिवशी मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं. 

चोरांनी घरातून रोख रक्कम आणि सोन लंपास केलं, तसंच हल्ल्यामध्ये अशोक कुमार यांची ८० वर्षांची आई सत्य देवी, बायको आशा देवी, मुलगा अपीन आणि कौशल यांनाही दुखापत झाली, असं पोलीस म्हणाले. सत्य देवी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर इतरांवर उपचार सुरू आहेत.