"भारतीय संघात जे दादा आहेत ना...", राहुल द्रविडने फलंदाजांची पाठराखण केल्यानंतर सुनील गावसकर संतापले

Sunil Gavaskar on Rahul Dravid: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) भारतीय फलंदाजांची पाठराखण केली आहे. मात्र सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी यावरुन खडे बोल सुनावत जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 14, 2023, 09:30 AM IST
"भारतीय संघात जे दादा आहेत ना...", राहुल द्रविडने फलंदाजांची पाठराखण केल्यानंतर सुनील गावसकर संतापले title=

Sunil Gavaskar on Rahul Dravid: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (World Test Championship) ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर जोरदार टीका होत आहे. भारताचा 209 धावांनी लाजिरवणारा पराभव झाला असून पाचव्या दिवशी लंचपर्यंतही मैदानावर टिकू शकले नाहीत. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही ठिकाणी भारतीय संघ सपशेल अपयशी ठरला. सामना संपल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटर्स सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनी राहुल द्रविडवर काही तिखट प्रश्नांचा मारा केला. 

बीसीसीआयचा माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने राहुल द्रविडला गेल्या काही वर्षात फलंदाजांची सरासरी कमी होत असल्यासंबंधी विचारलं. यावर राहुल द्रविडने फलंदाजांची पाठराखण करत सांगितलं की, प्रत्येक संघातील खेळाडूंची सरकारी कमी झाली आहे. याचं कारण कसोटी मैदानं आता निकाली ठरु लागली आहेत. 

"आमचे टॉप 5 फलंदाज अनुभवी आहेत. या खेळाडूंना महान म्हणून दर्जा मिळेल. याच खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकली आहे. हे चांगले खेळाडू आहेत. पण मी मान्य करतो की आणि तेदेखील मान्य करती की आपल्या उच्च दर्जाला साजेसा खेळ करत ते न्याय देऊ शकले नाहीत," असं राहुल द्रविडने स्टार स्पोर्ट्सच्या चर्चेदरम्यान सौरव गांगुलीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं.

"आम्ही यावर काम करत आहोत. काही विकेट्स फार आव्हानात्मक ठरत आहेत. हे एक चांगलं मैदान होतं. पण फलंदाजांसाठी अनेक गोष्टी चांगल्या नव्हत्या. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आता सामना ड्रॉ करण्यासाठी खेळू शकत नाही. भारतात अनेक खेळपट्ट्या आव्हानात्मक आहेत. भारताबाहेर खेळपट्ट्या निकाल देणाऱ्या आहेत. त्यामुळे याचा फटका फक्त आपल्याच नाही तर सर्व खेळाडूंना बसला आहे. मात्र हे नक्की आहे की, आपल्या गोलंदाजांना जास्त संधी मिळावी यासाठी मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. हेच आपण याआधी करत होतो," असं सांगत राहुल द्रविडने आपल्या फलंदाजांची पाठराखण केली.

दरम्यान लिटिल मास्टर आणि समालोचक सुनील गावसकर मात्र राहुल द्रविडच्या मताशी सहमत नाहीत. जे खेळाडू भारतात दादा आहेत, तेच परदेशात डगमगत आहेत अशा शब्दांत त्याने खडे बोल सुनावले आहेत. 

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की "तुमच्या इतर खेळाडूंची सरासरी किती आहे याच्याने फरक पडत नाही. आपण आता भारतीय संघाबद्दल बोलत आहोत. भारतीय खेळाडूंची सरासरी कोसळत असून, काहीतरी करण्याची गरज आहे. फलंदाजी ही एक समस्यांपैकी एक आहे. ते का होत आहे? याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तुम्ही भारतात चांगले खेळता. तुम्ही भारतात 'दादा' आहात. पण त्यातील काही परदेशात डगमगतात".

सुनील गावसकर यांनी यावेळी भारतीय संघाला मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हा प्रश्न हारण्याचा किंवा जिंकण्याचा नाही तर जिव्हारी लागणाऱ्या परभवाचा आहे असं ते म्हणाले. 

"कोचिंगचा दर्जा तुम्हाला हवा तसा नाही का? तुम्ही जिथे कमी पडत आहात त्याबद्दल जास्त विश्लेषण केलं जात नाही का? यानंतर प्रामाणिकपणे मूल्यांकन करण्याची फार गरज आहे. एक संघ जिंकणार आहे आणि एक हरणार आहे. पण तुम्ही कसे हारता ते महत्त्वाचं आहे. यामुळे फार वेदना होतात," अशी खंत सुनील गावसकर यांनी व्यक्त केली. 

नाराज झालेल्या सुनील गावसकरांनी पुढे सांगितलं की, "आम्हीही नॉक आऊट झालो आहोत. आमचीही स्थिती दयनीय होती. पण तुम्ही सध्याची स्थिती टीकेच्या पलीकडे आहे असं म्हणू शकत नाही. काय घडलं याबद्दल तुम्हाला विश्लेषण करावे लागेल. आमचा दृष्टिकोन योग्य होता का? आमची निवड योग्य होती का? या गोष्टी तुम्ही दुर्लक्षित करु शकत नाही".