कोलंबो : श्रीलंकेचा दिग्गज फास्ट बॉलर लसिथ मलिंगाने निवृत्तीची घोषणा केली आहे. याबद्दल मलिंगाने श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांना माहिती दिली आहे. २६ जुलै रोजी लसिथ मलिंगा त्याची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळेल. २६ तारखेला श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात पहिली वनडे खेळवण्यात येणार आहे. ही वनडे मलिंगाची अखेरची मॅच असेल.
लसिथ मलिंगाच्या निवृत्तीची माहिती श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने पत्रकार परिषदेमध्ये दिली. मलिंगाने मला निवृत्त होत असल्याची माहिती दिली, पण त्याने याबाबत निवड समितीला सांगितलं का नाही, याबाबात मला माहिती नाही, असं करुणारत्ने म्हणाला.
३५ वर्षांच्या लसिथ मलिंगाने २२५ मॅचमध्ये ३३५ विकेट घेतल्या. श्रीलंकेकडून मलिंगापेक्षा मुथय्या मुरलीधरन (५३४ विकेट) आणि चामिंडा वास (४०० विकेट) यांनीच सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड कपमध्ये मलिंगाने श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये मलिंगाला ७ मॅचमध्ये १३ विकेट मिळाल्या होत्या. श्रीलंकेच्या दुसऱ्या कोणत्याच बॉलरला १० पेक्षा जास्त विकेट घेता आल्या नव्हत्या.
आपल्या आगळ्यावेगळ्या बॉलिंग ऍक्शनसाठी प्रसिद्ध असलेल्या मलिंगाने ३० टेस्ट आणि ७३ टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचही खेळल्या. मलिंगाने टेस्टमध्ये १०१ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये ९७ विकेट घेतल्या. २००८-०९ पासूनच मलिंगाच्या फिटनेसचा प्रश्न उपस्थित होत होता. त्यामुळे त्याने २०१० नंतर एकही टेस्ट मॅच खेळली नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या मलिंगाने आयपीएल किंवा दुसऱ्या टी-२० लीगमध्ये खेळणार का नाही? याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून मलिंगा मुंबई इंडियन्ससोबत आहे. आयपीएल इतिहासात मलिंगा हा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. आयपीएलच्या ११ मोसमात मलिंगाने १२२ मॅच खेळून १७० विकेट घेतल्या. २०१८ सालच्या आयपीएलमध्ये मलिंगा मुंबईचा बॉलिंग प्रशिक्षक होता, यानंतर २०१९ साली तो पुन्हा मुंबईकडून खेळला.