मुंबई : कॉफी विथ करण या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन झालं आहे. करण जोहरच्या या कार्यक्रमात महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली. यानंतर बीसीसीआयनं दोन्ही क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परत भारतात बोलावलं. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही खेळाडू कोणत्याच प्रकारचं क्रिकेट खेळू शकणार नाहीत. हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्यावर चौफेर टीका होत असतानाच भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनं या दोघांची पाठराखण केली आहे.
माणसांकडून चुका होतात, त्यामुळे आपण आता पुढे गेलं पाहिजे आणि या चुका पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असं गांगुली म्हणाला. सध्याच्या क्रिकेटपटूंनी बोलताना सावध राहिलं पाहिजे का, असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला. तेव्हा, मी तो कार्यक्रम बघितला नाही. पण फक्त सध्याच्या क्रिकेटपटूंनी जबाबदारीनं वागलं पाहिजे, असं सामान्यकरण करणं योग्य नाही, असं उत्तर गांगुलीनं दिलं.
या सगळ्या वादानंतर चूक त्यांच्या लक्षात येईल आणि ते आणखी चांगली माणसं म्हणून समोर येतील, अशी अपेक्षा गांगुलीनं व्यक्त केली. आम्ही काही मशिन नाही. आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट योग्य असेलच असं नाही. ते दोघंही जबाबदार माणसं आहेत. दोघंही अनेकांचे रोल मॉडेल आहेत. खेळाडूंवर प्रत्येकवेळी प्रदर्शनाचा दबाव असतो. काही गोष्टी आयुष्यात होऊन जातात, त्या तिकडेच सोडून दिल्या पाहिजेत, असं वक्तव्य गांगुलीनं केलं.
सध्याचे क्रिकेटपटू हे जबाबदार, शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक आहेत. प्रत्येक जण आयुष्यात चुका करतात. हा वाद जास्त ताणण्यात अर्थ नाही. विराट कोहलीकडे बघा. विराट आज अनेकांचा रोल मॉडेल आहे. विराटसारखे खेळाडू प्रत्येक पिढीमध्ये तयार होत आहेत, हे भारताचं भाग्य असल्याचं गांगुली म्हणाला.
सुनिल गावसकर निवृत्त झाले तेव्हा पुढे कोण असा प्रश्न प्रत्येकाला पडला. यानंतर सचिन तेंडुलकर आला. सचिन निवृत्त झाल्यानंतरही तोच प्रश्न होता, पण विराट कोहली आला. हे सगळे क्रिकेटपटू चांगली माणसं आहेत कारण ते मध्यमवर्गातून वर आले आहेत आणि त्यांनी संघर्ष केला आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.