बडोदा : कॉफी विथ करण या शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन झालं आहे. बीसीसीआयकडून चौकशी पूर्ण होईपर्यंत या दोघांना कोणत्याही प्रकारचं क्रिकेट खेळता येणार नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर या दोघांना काय शिक्षा द्यायची याचा निर्णय होणार आहे. पण या चौकशीचा निकाल यायच्या आधीच हार्दिक पांड्याला पश्चाताप झालेला आहे. हार्दिक पांड्यानं सोशल नेटवर्किंग वापरणं सोडून दिलंयं, तसंच हार्दिक पांड्या कोणाचेही फोन उचलत नसल्याचं हार्दिक पांड्याचे वडिल हिमांशू पांड्या यांनी सांगितलं आहे.
एवढच नाही तर हार्दिक पांड्यानं यावर्षी मकर संक्रातही साजरी केली नाही. हार्दिक पांड्या गुजरातच्या बडोद्याचा आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर मकर संक्रातीचा उत्साह असतो. पण हार्दिकनं संक्रातही साजरी केली नसल्याचं हिमांशू पांड्या म्हणाले. गुजरातमध्ये संक्रात हा एक सण असतो. यादिवशी सगळ्यांना सुट्टी असते. यादिवशी सगळेजण पतंग उडवतात. हार्दिकलाही पतंग उडवायला आवडतं, पण यावर्षी घरी असूनही त्यानं पतंग उडवली नाही, अशी प्रतिक्रिया हिमांशू पांड्या यांनी दिली.
मधली काही वर्ष क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हार्दिक पांड्या घरी नसायचा. यावर्षी मात्र तो घरी होता, पण तरी त्याचा पतंग उडवायचा मूड नव्हता, असंही हिमांशू पांड्या यांनी सांगितलं.
निलंबन झाल्यामुळे हार्दिक पांड्या निराश आहे. करण जोहरच्या कार्यक्रमात जी वक्तव्य केली त्याचा हार्दिकला पश्चाताप होत आहे. पुन्हा अशी चूक करणार नसल्याची शपथ हार्दिकनं घेतली असल्याचं हिमांशू म्हणाले. या वादाबद्दल आम्ही हार्दिकशी काहीही बोलणार नसल्याचं ठरवलं आहे. त्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्यानंही याबद्दल त्याच्याशी चर्चा केली नाही. आम्ही आता बीसीसीआयच्या निर्णयाची वाट बघत आहे, असं वक्तव्य हिमांशू पांड्या म्हणाले.
'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिला आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांचं निलंबन करून त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघारी बोलावण्यात आलं होतं. तसंच बीसीसीआयनं या दोघांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. यानंतर दोघांनी बिनशर्त माफी मागितली होती. आता या दोघांची बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी यांनी चौकशी केली आहे. राहुल जोहरी या दोघांशी फोनवरून बोलले आहेत. यानंतर आता राहुल जोहरी त्यांचा रिपोर्ट प्रशासकीय समितीला देतील.
दोन्ही क्रिकेटपटूंची कारकिर्द धोक्यात टाकण्याऐवजी ते कसे सुधारतील याकडे लक्ष द्या, असं प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयला सांगितलं. खेळाडूंनी माफी मागितल्यानंतरही बीसीसीआयच्या १० सदस्यांनी या खेळाडूंच्या चौकशीसाठी लोकपाल नियुक्त करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याची मागणी केली आहे. तर प्रशासकीय समितीमध्ये असलेल्या विनोद राय यांच्या सहकारी डायना एडुल्जी यांनी प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पांड्या आणि राहुलची चौकशी करावी, असं मत मांडलं आहे.