'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल!

Shoaib Akhtar Statement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात (PAK vs AUS) पाकिस्तानला 62 धावांनी पराभव स्विकारावा लागला. वर्ल्ड कपमधील दुसऱ्या पराभवानंतर आता माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानी संघाला खडेबोल सुनावले आहेत.  

सौरभ तळेकर | Updated: Oct 21, 2023, 04:03 PM IST
'मला लाज वाटते, सेमीफायनलमध्ये पोहोचायचंय तर...', शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला सुनावले खडे बोल! title=
shoaib akhtar lashes out at pakistani players after lost aus vs pak match

World Cup 2023, PAK vs AUS : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia vs Pakistan) पाकिस्तानचा 62 रन्सने पराभव केलाय. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांसमोर पाकिस्तानच्या दुबळ्या बॉलिंगचं प्रदर्शन पहायला मिळालं. कांगारूंच्या दोन्ही सलामीवीरांनी शतक मारलं अन् पाकिस्तानला 367 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ 305 धावांवर भुईसपाट झाला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने 4 गुण अंकतालिकेत नोंदवले आहेत. तर पाकिस्तानला वर्ल्ड कपमधील (Cricket World Cup) दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाकिस्तानची कामगिरी पाहता पाकिस्तानचे चाहते नाराज असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने बाबर अँड कंपनीला खडे बोल सुनावले आहेत.

झी मीडियासोबत चर्चा करत असताना शोएब अख्तर याने पाकिस्तान क्रिकेट संघाचे वाभाडे काढले. ऑस्ट्रेलियाच्या संघाने आमचा बदला घेतलाय. ऑस्ट्रेलियाने आमच्या गोलंदाजांना इतकं फटकवलंय की आमच्या गोलंदाजांना घाम फोडलाय. ऑस्ट्रेलिया संघाने आम्हाला पराभूत केलंय, हे आमच्यासाठी निराशाजनक आहे. पाकिस्तानच्या बॉलिंगची एकेकाळी दहशत होती. मला समजत नाहीये की पाकिस्तानचा संघ असा का खेळतोय? असं शोएब अख्तर म्हणाला आहे. त्याचं झालं असं की, ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या दोन्ही सामन्यात हरला होता. त्यामुळे त्याचा राग कांगारू पाकिस्तानवर काढेल, असं शोएब अख्तर काही दिवसांपूर्वी म्हणाला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने आमचा बदला घेतलाय, असं वक्तव्य शोएब अख्तरने केलंय.

पाकिस्तानचे खेळाडू असं कसं करू शकतात. मला लाज वाटते. आत्तापर्यंतच्या वर्ल्ड कप सामन्यात पाकिस्तानच्या संघाचा दबदबा होता. आमची दहशत होती. मात्र, आत्ताच्या संघात असं काहीच दिसत नाहीये. माझ्यासाठी ही धक्कादायक गोष्ट आहे. पाकिस्तान संघाने मागील सर्व सामन्यात समाधानकारक प्रदर्शन केलं नाही, अशी खंत देखील त्याने बोलून दाखवली. शेवटच्या 15 ओव्हरमध्ये संघाची कामगिरी चांगली राहिलीये. मात्र, पहिल्या 10 ओव्हरमध्ये निराशा हाती लागली. त्यांच्या या प्रदर्शनामुळे पाकिस्तानचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचेल असं वाटत नाही, असं शोएब अख्तर याने म्हटलं आहे.

आणखी वाचा - BCCI च्या तयारीचं पितळ उघडं! प्रेक्षक गॅलरीत कोसळलं भलं मोठं होर्डिंग; धक्कादायक Video समोर

दरम्यान, फलंदाज तुम्हाला सामने जिंकवून देतात, तर गोलंदाज मालिका जिंकवतात, असं म्हटलं जातं. पाकिस्तान संघामध्ये महत्त्वाची कडी राहिलीये, ती त्यांची गोलंदाजी. मात्र, शाहिन शाह वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. रोहित शर्माच्या सिक्सनंतर हॅरिस रौफचा आत्मविश्वास ठासळलेला दिसतोय. तर फलंदाजीमध्ये सात्त्याने बदल होतोय. तर कॅप्टन बाबर आझमला आत्तापर्यंत मोठी खेळी करता आली नाही. रिझवान एकटा पाकिस्तानच्या संघाला सावरतोय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.