शिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे

Updated: Jun 8, 2017, 11:19 PM IST
शिखर धवनचं शतक पाण्यात, श्रीलंकेकडून भारताचा ७ विकेटनं पराभव title=
सौजन्य : आयसीसी

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमधील मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताचा ७ विकेटनं पराभव केला आहे. ३२२ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेची पहिली विकेट लवकर गेली पण गुणतिलका आणि कुसल मेंडिसमध्ये झालेल्या पार्टनरशीपमुळे श्रीलंकेनं या मॅचमध्ये कमबॅक केलं.

एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना मेंडिसनं ८९ तर गुणतिलकानं ७६ रन्स केल्या. या दोघांची विकेट गेल्यावर मग कुसल परेरा(४७), अंजलो मॅथ्यूज(नाबाद ५२) आणि गुणरत्नेनं (नाबाद ३४)श्रीलंकेला विजयापर्यंत पोहोचवलं.

त्याआधी श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मानं भारताला १३८ रन्सची सुरुवात करून दिली. शिखर धवननं १२५ रन्सची खेळी करून भारताच्या इनिंगला आकार दिला. तर रोहित शर्मानं ७९ बॉल्समध्ये ७८ आणि धोनीनं ५२ बॉल्समध्ये ६३ रन्स केल्या.

या पराभवामुळे भारताचं सेमी फायनलमध्ये जायचं आवाहन आणखी कठीण झालं आहे. सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी आता भारताला दक्षिण आफ्रिकेला हरवावं लागणार आहे. भारताचा दक्षिण आफ्रिकेबरोबरचा मुकाबला रविवारी ११ जूनला होणार आहे.