Shakib Al Hasan ruled out : वर्ल्ड कप सुरू होण्याआधी बांगलादेश क्रिकेट बोर्डामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं होतं. अशिया कपमधून बाहेर पडल्यानंतर तमिम इक्बलाने पाठीच्या दुखापतीचं कारण देत बांगलादेश एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर पंतप्रधानांच्या विनंतीनंतर त्याला कॅप्टन्सी देण्यात आली खरी.. मात्र, वर्ल्ड कपच्या संघाची घोषणा होताच त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यामुळे अनपेक्षितरित्या शाकिब अल हसनच्या खांद्यावर कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, दैव देतं अन् कर्म नेतं अशी गत शाकिब अल हसन झाली आहे.
श्रीलंकाविरुद्ध खेळताना अँजेलो मॅथ्यूज याला बाद करण्यासाठी शाकिबने टाईम आऊटची अपिल केली अन् क्रिडाविश्वास एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं. अशातच आता शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) वर्ल्ड कपमधून बाहेर पडला (Ruled out) आहे. शाकिबला डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना ही फलंदाजी झाली.
बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 11 नोव्हेंबर रोजी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये सामना खेळवला जाईल. मात्र, शाकिब अल हसन या सामन्यात खेळणार नसल्याचं आता समोर आलं आहे. फिजिओ बेजेदुल इस्लाम खान यांनी शाकिबच्या दुखापतीबाबत दिली, डावाच्या सुरुवातीला शाकिबच्या डाव्या हाताच्या तर्जनीला बॉल लागला होता, पण त्याने सपोर्टिव्ह टेपिंग आणि पेनकिलरसह फलंदाजी केली होती. दिल्लीत इमर्जन्सी एक्स-रे घेण्यात आला, त्याला बरे होण्यासाठी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागेल, अशी माहिती इस्लाम खान यांनी दिली आहे.
दरम्यान, शकीबने 65 चेंडूंत 12 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 82 धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली. शाकिबच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर बांगलादेशने श्रीलंकेला 53 चेंडू बाकी असताना 280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तीन गडी राखून मात केली. मात्र, आता तो शेवटच्या सामन्यात खेळणार नसल्याने बांगलादेशचा संघ जिंकणार कसा? असा सवाल विचारला जातोय. पुढील उपचारासाठी शाकिब अल हसन आजच बांगलादेशला रवाना होईल, अशी माहिती देखील देण्यात आली आहे.