मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं काश्मीर प्रश्नात आपलं नाक खुपसलं आहे. भारत व्याप्त काश्मीरमध्ये निष्पाप नागरिकांची हत्या करण्यात येत आहे. स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्था आता कुठे आहेत? या संस्था रक्तपात थांबवण्यासाठी कोणताच प्रयत्न का करत नाहीत, असं ट्विट शाहिद आफ्रिदीनं केलं आहे.
Appalling and worrisome situation ongoing in the Indian Occupied Kashmir.Innocents being shot down by oppressive regime to clamp voice of self determination & independence. Wonder where is the @UN & other int bodies & why aren't they making efforts to stop this bloodshed?
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018
काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं १३ दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आफ्रिदीनं हे ट्विट केलं आहे. काश्मीरमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या एन्काऊंटरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले तर ४ नागरिकांना प्राण गमवावे लागले. अरविंदर कुमार, निलेश सिंग आणि सेपॉय हेतराम हे जवान शहीद झाले.
रईस अहमद ठोकर आणि इशफाक अहमद मलिक असं मारण्यात आलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. या दहशतवाद्यांनी मे २०१७ मध्ये भारतीय लष्कराचे अधिकारी उमर फैयाज यांची सुट्टीवर असताना घरात हत्या केली होती.
याआधी २०१६ साली भारतात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपवेळी आफ्रिदीनं काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ही मॅच बघण्यासाठी अनेक काश्मिरी आले आहेत, असं आफ्रिदी तेव्हा म्हणाला होता. २०१७ साली निवृत्त झालेला आफ्रिदी पाकिस्तानकडून २७ टेस्ट, ३९८ वनडे आणि ९८ टी-20 खेळला आहे. २०११ सालच्या वर्ल्ड कपमध्ये आफ्रिदीनं पाकिस्तानचं नेतृत्व केलं होतं.