T20 WC: सेमीफायनलचे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले, पहा कसे...

न्यूझीलंडकडून सामना हरल्यानंतर टीम इंडियाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्गही कठीण दिसतोय.

Updated: Nov 1, 2021, 08:18 AM IST
T20 WC: सेमीफायनलचे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले, पहा कसे... title=

दुबई : T-20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ ही स्पर्धा जिंकण्याचा दावेदार होता. पण पाकिस्तान आणि आता न्यूझीलंडकडून सामना हरल्यानंतर टीम इंडियाचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्गही कठीण दिसतोय. भारताला आता उपांत्य फेरी गाठायची असेल तर चमत्कारच घडू शकतो. कारण अफगाणिस्तानला न्यूझीलंडवर मात करणं आवश्यक आहे.

सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो भारत?

या T20 वर्ल्डकपमध्ये भारत ग्रुप-2 चा भाग आहे. यामध्ये पाकिस्तानने आपले तिन्ही सामने जिंकलेत. अशा स्थितीत उपांत्य फेरी गाठणं निश्चित मानलं जातंय. न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणारी लढत आता दुसऱ्या संघाची आहे. भारताने आपले दोन्ही सामने मोठ्या फरकाने गमावले आहेत, त्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना आगामी तीन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.

वर्ल्डकपमध्ये पुढे आता भारताला अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडचा सामना करायचा आहे. टीम इंडियाने तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले, तरच त्याचा नेट-रन रेट सुधार होऊ शकतो आणि तरच उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा जिवंत राहतील.

अफगाणिस्तानवर सर्व गोष्ट अवलंबून

टीम इंडियाचा पुढचा सामना आता अफगाणिस्तान विरुद्ध आहे, जर टीम इंडियाने हा सामनाही गमावला तर त्याचा सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होईल. पण जर टीम इंडियाने तो मोठ्या फरकाने जिंकला आणि नंतर अफगाणिस्तानच्या टीमने न्यूझीलंडला हरवलं तर टीम इंडियाच्या आशा वाढू शकतात. यामुळे टीम इंडियाला नेट-रनरेटच्या मदतीवर सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग खुला होऊ शकतो.

न्यूझीलंडकडून भारताचा पराभव

टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup) दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला आहे. टीम इंडिया पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 10 विकेट्स राखून पराभूत झाली. या स्पर्धेतील टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव आहे. टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या आशाही आता कठीण झाल्या आहेत.