मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर २१५/२ असा आहे. चेतेश्वर पुजारा ६८ रनवर नाबाद तर कर्णधार विराट कोहली ४७ रनवर नाबाद खेळत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मिचेल जॉनसननं विराट कोहलीला थेट आव्हान दिलं आहे. या टेस्टमध्ये शतक कर नाहीतर निवृत्त हो, असं ट्विट मिचेल जॉनसननं केलं आहे.
मेलबर्नमधल्या खेळपट्टीचं वर्णन करण्यासाठी मिचेल जॉनसननं एका रस्त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. मेलबर्नमधली खेळपट्टी ही या रस्त्यासारखी सपाट असल्याचं सांगण्याचा जॉनसनचा उद्देश होता. जॉनसनच्या या ट्विटनंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.
विराट कोहली शतक मारणार असल्यामुळे तू आता कारणं द्यायला सुरुवात केलीस का? असा सवाल एका यूजरनं जॉनसनला विचारला. या ट्विटवर प्रतिक्रिया देताना जॉनसननं विराटलाच आव्हान दिलं. मी कोणतंही कारण देत नाही. मी या टेस्टमध्ये खेळत नाही. पण विराटनं या टेस्टमध्ये शतक केलं नाही, तर त्यानं निवृत्त व्हावं, असं जॉनसन म्हणाला.
पहिल्या दोन टेस्टमध्ये वारंवार अपयशी ठरत असलेल्या ओपनर केएल राहुल आणि मुरली विजयला या मॅचमधून डच्चू देण्यात आला. या दोघांऐवजी हनुमा विहारी आणि मयंक अग्रवाल ओपनिंगला आले. या दोघांनी भारताला ४० रनची सावध सुरुवात करून दिली. पहिल्या १८ ओव्हरमध्ये दोघांनी विकेट गमावली नाही. पण हनुमा विहारीच्या रुपात भारताला पहिला धक्का लागला. ६६ बॉलमध्ये ८ रन करून विहारी आऊट झाला. तर आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या मयंक अग्रवालनं ७६ रनची खेळी केली. मयंकच्या या खेळीमध्ये ८ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता.