भारत World Cup Final का हरला? अखिलेश यादव जाहीर सभेत म्हणाले, '..तर भगवान विष्णू..'

Akhilesh Yadav On World Cup 2023 Final: 19 तारखेला गुजरातमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्ने पराभूत करुन सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 22, 2023, 08:36 AM IST
भारत World Cup Final का हरला? अखिलेश यादव जाहीर सभेत म्हणाले, '..तर भगवान विष्णू..' title=
जाहीर भाषणादरम्यान केलं हे विधान

Akhilesh Yadav On World Cup 2023 Final: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कप 2023 च्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. भारतावर ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवल्याने भारतीय चाहते नाराज झाले आहेत. अगदी क्रिकेट चाहत्यांपासून राजकीय वर्तुळामध्येही या पराभवाची चर्चा आहे. मंगळवारी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याबद्दल भाष्य करताना राजकीय टोला लगावला आहे. त्यांनी भारतीय संघ का पराभूत झाला याबद्दल उपाहात्मक पद्धतीने भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यांचं तर्क ऐकून अनेकजण हैराण झाले आहे. 

काय म्हणाले अखिलेश?

जो सामना (वर्ल्ड कप 2023 फायनल) गुजरातमध्ये झाला तोच जर लखनऊमध्ये झाला असता तर आपल्याला (भारतीय संघाला) भरपूर लोकांचा आशीर्वाद मिळाला असता, असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. "सामना इथे (लखनऊमध्ये) झाला असता तर भारतीय संघाला भगवान विष्णू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा आशीर्वाद मिळाला असता. भारत जिंकला असता. आता असं ऐकू येत आहे की त्या खेळपट्टीमध्ये गडबड होती. अर्धवटच तयारी या सामन्यासाठी कर्ण्यात आली होती," असंही अखिलेश यादव म्हणाले.

भगवान विष्णू आणि अटल बिहारी वाजपेयींचा संबंध काय?

लखनऊमधील क्रिकेट मैदानाचं नाव आधी इकाना असं होतं. हे भगवान विष्णूचं नाव आहे. आता भाजपाच्या लोकांनी त्या मैदानाचं नाव अटल बिहारी वाजपेयी असं केलं आहे. जर सामना लखनऊमध्ये खेळवण्यात आला असता तर भगवान विष्णूबरोबरच अटल बिहारी वाजपेयी यांचा आशीर्वादही मिळाला असता, असं अखिलेश यांनी इटावामधील जाहीर सभेत म्हटलं आहे.

संजय राऊतांनी मुंबईत फायनल खेळवण्याबद्दल केलेलं भाष्य

वर्ल्ड कप फायलनबद्दल दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. "आपण पराभूत झाल्याचं सर्वांनाच दु:ख झालं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आपला संघं फारच उत्तम आहे. त्यांनी वर्ल्ड कपमधील पहिले 10 सामने जिंकले. मात्र फायनलमध्ये आपण नरेंद्र मोदी स्टेडियमवर पराभूत झालो. लोक म्हणतात की वानखेडेवर सामना खेळवला असता तर आपण जिंकलो असतो. मला नेमकं ठाऊक नाही हे कारण मी क्रिकेट चाहता नाही. मात्र जसं इंग्लंडमध्ये लॉर्ड्स हे क्रिकेटचं सर्वात महत्त्वाचं मैदान समजलं जातं. तसं वानखेडे आहे. मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. क्रिकेटचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी वानखेडे आणि मुंबई फार महत्त्वाची जागा आहे. दिल्लीमधील फिरोज शाह कोटलामध्येही सामने खेळवले जातात," असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

भारतीय जनता पार्टीचा मोठा प्लॅन

या मैदानातच वर्ल्ड कप खेळून जिंकायचा आणि श्रेय मोदींना द्यायचं असा भाजपाचा प्लॅन होता असा दावाही राऊत यांनी केला. "सरदार वल्लभाई पटेल यांचं नाव बदलून ते नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. तिथे वर्ल्ड कप खेळवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हे नाव बदलण्यात आलं वर्ल्ड कप जिंकला तर नरेंद्र मोदी स्टेडियमवर जिंकला. मोदीजी तिथे होते म्हणून जिंकला, असा भारतीय जनता पार्टीचा मोठा प्लॅन सुरु होता. मात्र या देशाचं दुर्देव आहे की भारतीय संघ चांगला खेळूनही पराभूत झाला," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.