Sam Konstas Mocks Virat Kohli Video: मेलबर्न कसोटीमध्ये भारतीय संघाचा 184 धावांनी पराभव झाला. या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा सॅम कोस्टास संपूर्ण पाच दिवस चांगलाच चर्चेत राहिला. पहिल्या दिवशी विराट कोहलीबरोबर धडक झाल्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या सॅमने कसोटीच्या शेवटच्या दिवशी खांदे उडवत मैदानात डान्स करुन विराट कोहलीला डिवचलं आहे.
मेलबर्न कसोटीच्या पाचव्या दिवशी सॅम कोस्टासने बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करताना शोल्डर डान्स केला, भारतीय संघाच्या दुसऱ्या डावामध्ये 52 वी ओव्हर सुरु असताना हा प्रकार घडला. बॉण्ड्रीजवळ क्षेत्ररक्षण करणारा सॅम कोस्टास हा ऑस्ट्रेलियन चाहत्यांबरोबर गप्पा मारताना दिसला. चाहत्यांनी आरडाओरड करत प्रोत्साहन दिल्यानंतर सॅम कोस्टास आपला उजवा खांदा उडवत चाहत्यांकडे पाहत नाचू लागला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपल्या पदार्पणाच्या कसोटीमध्ये आक्रमक खेळी करत असतानाच खेळपट्टीवर सॅम कोस्टास आणि विराट कोहलीची धडक झालेली.
यामध्ये विराटचा खांदा सॅम कोस्टासला लागला होता. त्याच गोष्टीकडे सॅम कोस्टासने शेवटच्या दिवशी डान्स करुन पुन्हा लक्ष वेधलं. सॅम कोस्टासला धडक दिल्याबद्दल विराटला दोषी ठरवण्यात आलं. आयसीसीच्या 2.12 नियमानुसार त्याला दोषी ठरवत 20 टक्के मानधन कापण्यात आलं. आता यावरुनच कोस्टासने भारत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विराटला पुन्हा डिवचलं आहे.
— Sunil Gavaskar (@gavaskar_theman) December 30, 2024
सामन्यातील 10 व्या ओव्हरनंतर विराट कोहली स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी पीचच्या दुसऱ्या बाजूला जात असताना सॅम आणि त्याची धडक झाली. विराटने समोरुन येणाऱ्या सॅमच्या उजव्या खांद्याला आपल्या उजव्या खांद्याने धक्का दिला. आधी 36 वर्षीय विराटने मागे वळूनही पाहिलं नाही. मात्र आपल्याला विराटने धक्का दिल्याचं सॅमला आवडलं नाही. तो विराटला काहीतरी बोलला. मात्र हे ऐकून विराटने करड्या नजरेनं मागे पाहिलं. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र उस्मान ख्वाजा आणि पंच डेव्हीड गुह या दोघांनी दोन्ही क्रिकेटपटूंना वाद वाढवू देण्यापासून रोखलं. या वादाचा सॅमच्या फलंदाजीवर काहीच परिणाम झाला नाही.
सॅमने 52 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने अर्थशतक झळकावल्यानंतर आपल्या जर्सीवरील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या लोगोकडे बोट दाखवत बॅट उंचावून ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना अभिवादन केलं. त्यानंतर लगेचच सॅमने मोहम्मद सिराजला पूल शॉट लगावत चौकार मारला. सॅम हा चौथा सर्वात कमी वयात पदार्पण करणार ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. आज पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवणार सॅम हा केवळ 19 वर्ष 85 दिवसांचा आहे.