Sachin Tendulkar On Anti tobacco day: टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने नुकतंच आयुष्याचं अर्धशतक पूर्ण केलं. असा कोणता विक्रम नसेल, ज्याला सचिनचं नाव जोडलं गेलं नाही. ज्या काळात बॉलर्सला पाहून बॅटर्सची भंबेरी उडायची. त्याच काळात सचिन तगड्या बॉलर्सच्या डोक्यावरून सिक्स मारायचा. सचिन क्रिकेटच्या दुनियेबाहेर देखील हिरो ठरलाय. नुकताच सचिनचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होताना दिसतोय. त्यामध्ये त्याने आपल्या वडिलांना दिलेल्या वचनाबद्दल भाष्य केलंय.
सचिन तेंडुलकरने जागतिक तंबाखू दिनानिमित्त (Anti tobacco day) एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना एक घटना शेअर केली. सचिनने आपल्या वडिलांना दिलेल्या वचनामुळे तंबाखू कंपनीचा कोरा चेक कसा नाकारला यावर बोलतं करणारा हा व्हिडिओ आहे. तुम्हाला आठवत असेल तर आयपीएल सुरू असताना कपिल देव, सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि ख्रिस गेल यांच्यासह अनेक खेळाडू तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या टीकेची झोड देखील उठली होती.
जेव्हा मी भारताकडून खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी शाळकरी वयात होतो. मला अनेक जाहिरातींच्या ऑफर्स मिळू लागल्या, पण माझ्या वडिलांनी मला कधीही तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करू नको, असं सांगितलं. मला अशा अनेक ऑफर आल्या होत्या, पण मी कधीच स्वीकारल्या नाहीत, असं सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) म्हणाला आहे.
माझ्या बॅटवर तंबाखूजन्य पदार्थांचे स्टिकर लावून त्याच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी मला अनेक ऑफर मिळाल्या होत्या, पण मला ती सगळी प्रसिद्धी करायची नव्हती. या दोन्ही गोष्टींपासून मी लांब राहिलो आणि मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन कधीही मोडलं नाही, असंही सचिन (Sachin Tendulkar On Anti tobacco day) म्हणाला आहे.
Say no to tobacco @sachin_rt denied Rs 20 cr deal (for a year) in 2010 because he made a promise to his father.#SayNoToTobacco #SachinTendulkar #AntiTobaccoDay pic.twitter.com/eUdq2YoJEi
— Nitin jain(Sachinsuperfan) (@NitinSachinist) May 31, 2023
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दरवर्षी 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून घोषित केला आहे. तंबाखूच्या वापरामुळे भारतात तोंडाचा कर्करोगाचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची गरज असल्याचं मत तज्ज्ञांनी वर्तविलं आहे.