मुंबई : यंदाच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात काही खास चांगली झालेली नाही. 5 वेळा आयपीएलचा खिताब जिंकणाऱ्या मुंबईला यावेळी सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. इतकंच नव्हे तर टीमचा कर्णधार रोहित शर्माचा खेळही काही फार चांगला झालेला दिसला नाही. सलग 3 पराभव स्विकारल्यानंतर रोहितने एक पोस्ट केली आहे. सध्या रोहितची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सविरूद्ध झालेल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभव हिटमॅनने 7 एप्रिलला ऑफिशियल इन्स्टाग्रामवरून एक पोस्ट केलीये. या पोस्टमध्ये रोहितने मुंबई इंडियन्सच्या टीमचा फोटो शेअर केला आहे. याला कॅप्शन देताना रोहित म्हणाला, "आम्ही चांगल्या किंवा वाईट काळात एकत्र असतो. आणि हीच आमची ताकद आहे. तुम्ही अजून काहीच पाहिलं नाहीये."
मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीयो शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीयोमध्ये कर्णधार रोहित शर्मा टीमच्या इतर खेळाडूंना महत्त्वाचा मेसेज देतोय. रोहित म्हणतो, आपण कोणाला जबाबदार ठरवू शकत नाही. यामध्ये आपण सर्व एकत्र आहोत, आपण एकत्र जिंकतो आणि पराभवंही एकत्रंच स्विकारतो.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, आपण टूर्नामेंटमधील 3 सामने हरलो याचा अर्थ असा नाही की आपण मान खाली घातली पाहिजे. कारण आता टूर्नामेंटमध्ये सुरुवातीचे दिवस आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार आणि 2013 पासून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबईच्या खराब सुरुवातीनंतर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहित करताना दिसला.