रोहितचा विक्रमाचा पाऊस; द्रविडसोबतच अनेकांची रेकॉर्ड मोडली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.

Updated: Oct 5, 2019, 07:36 PM IST
रोहितचा विक्रमाचा पाऊस; द्रविडसोबतच अनेकांची रेकॉर्ड मोडली title=

विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली. याचसोबत रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. रोहित शर्माने या मॅचमध्ये दोन्ही इनिंग मिळून तब्बल १३ सिक्स मारल्या. एका मॅचमध्ये एवढ्या सिक्स मारण्याचा हा विक्रम आहे. रोहितने पहिल्या इनिंगमध्ये १७६ रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १२७ रन केले.

एका टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा वसीम अक्रमचा विक्रम रोहित शर्माने मोडीत काढला. अकरमने १९९६ साली झिम्बाब्वेविरुद्ध २५७ रनची खेळी केली होती. या खेळीमध्ये अकरमने १२ सिक्स मारले होते. त्या मॅचमध्ये पाकिस्तानला दुसऱ्यांदा बॅटिंगची संधी मिळाली नाही. ती मॅच ड्रॉ झाली होती.

भारताकडून टेस्टमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड याआधी नवजोतसिंग सिद्धूच्या नावावर होता. सिद्धूने १९९४ साली श्रीलंकेविरुद्ध लखनऊ टेस्टमध्ये ८ सिक्स मारले होते. त्या मॅचमध्ये सिद्धूने १२४ रनन केले होते.

द्रविडलाही मागे टाकलं

रोहित शर्माने भारतामध्ये लागोपाठ ७ इनिंगमध्ये ५० पेक्षा जास्त रन केले आहेत. याचसोबत रोहितने राहुल द्रविडचा विक्रम मोडित काढला. द्रविडने १९९७-९८ साली भारतात लागोपाठ ६ इनिंगमध्ये ५० पेक्षा जास्त रन केले होते. रोहित शर्माने २०१६ ते २०१९ दरम्यान भारतात खेळलेल्या टेस्टमध्ये लागोपाठ ७ वेळा ५० पेक्षा जास्त रन केल्या.

रोहित शर्माच्या भारतातल्या लागोपाठ ७ इनिंग

१२७ रन

१७६ रन

५० नाबाद रन

६५ रन

१०२ नाबाद रन

५१ नाबाद रन

८२ रन 

टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग करताना दोन शतकं करणारा रोहित हा जगातला पहिला बॅट्समन ठरला आहे. तर मॅचमध्ये २ शतकं करणारा रोहित गावसकर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ओपनर आहे. विजय हजारे, सुनिल गावसकर (३वेळा), राहुल द्रविड (३ वेळा), विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनीही एका टेस्टमध्ये २ शतकं केली आहेत.