नवी दिल्ली : स्वित्झरलॅंडचा आंतरराष्ट्रीय टेनिसपटू रॉजर फेडररने यंदाचा पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बाजी मारली. या कामगिरीमुळे तो जगातील क्रमांक एकचा खेळाडू ठरला आहे. तसेच, जगातील सर्वाधीक वयस्कर टेनिसपटू ठरण्याचा मानही त्याला मिळाला आहे. ३६ वर्षीय फेडररने रोटरडम ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये हॉलंडच्या रॉबिन हासेला ४-६, ६-१, ६-१ अशा फरकाने पराभूत केले. फेडररने नुकतेच आपल्या २०व्या ग्रॅंड स्लॅमवरही नाव कोरले होते.
आपला प्रतिस्पर्धी राफेल नदालचा विक्रम मोडीत काढत रॉजरने हा बहुमान आपल्या नावावर केला. या सोबतच रॉजरने आंद्र आगासीचाही विक्रम मोडीत काढला आहे. २००३मध्ये अगासीने ३३ वर्षांचा असताना १३१ दिवसांमध्ये ही कामगिरी केली होती. आपणास आश्चर्य वाटेल पण, फेडररने गेल्या वर्षी जानेवरी मिहिन्यात जागतीक क्रमवारीत १७वे स्थान पटकावले होते.त्यानंतर पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमन करत फेडररने आपले स्थान मजबूत केले.
मागील सामना जिंकल्यावर फेडररने प्रतिक्रिया दिली होती की, हा सामना माझ्यासाठी आव्हान होता. सामना जिंकून वरचे स्थान मिळविण्यासाठी मी प्रचंड प्रयत्न केले. हे स्थान मिळविण्यासाठी गेली अनेक वर्षे मला प्रचंड प्रयत्न करावे लागले. फेडररने म्हटले की, 'फेब्रुवारी २०१६मध्ये झालेल्या घोट्यावरच्या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला हे स्थान मिळवता येईल का? याबाबत मला काळजी वाटत होती.'