Dubai Capitals vs Gulf Giants : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) तडाखेबंद खेळी केली आहे. उथप्पाने आंतरराष्ट्रीय टी-20 लीगमध्ये (International League T20) चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. दुबई कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या रॉबिन उथप्पाने आक्रमक सुरूवात करून दिली. (Robin Uthappa Hitting Runs Dubai Capitals vs Gulf Giants in International League T20 Mararthi Sport News)
रॉबिन उथप्पाने अवघ्या 46 बॉलमध्ये 79 धावांची खेळी केली, यामध्ये त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. गल्फ जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 171च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर दुबई कॅपिटल्स आणि गल्फ जायंट्समध्ये (Dubai Capitals vs Gulf Giants) सामना सुरू होता.
इंग्लंडचा माजी कर्णधार ज्यो रूट आणि उथप्पा यांनी 71 धावांची सलामी दिली. यामध्ये अवघ्या 6 धावांवर ज्यो रूट बाद झाला होता. दुसरीकडे उथप्पाने आपला दांडपट्टा चालू ठेवला होता. उथप्पासह रोव्हमन पॉवेलने 38 आणि सिकंदर रझाने 30 धावांच्या जोरावर संघाने 182 धावांची मजल मारली होती.
दरम्यान, दुबई कॅपिटल्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गल्फ जायंट्सने 19 ओव्हरमध्येच लक्ष्य पूर्ण केलं. कर्णधार जेम्स विन्सच्या नाबाद 83 आणि गेरहार्ड इरास्मसच्या 52 धावांच्या जोरावर गल्फ जायंट्सने हा सामना खिशात घातला.
दरम्यान, बीसीसीआय कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. यामुळेच गेल्या वर्षी रॉबिन उथप्पाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. उथप्पाशिवाय भारताचा युसूफ पठाणही या मोसमात दुबई कॅपिटल्सकडून खेळत आहे.