ऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य

Rishabh Pan World Cup 2023: क्रिकेट विश्वातून सध्या बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या येताना दिसत असून, भारतीय संघामध्ये त्या धर्तीवर बरेच बदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिथं Bumrah संघातून बराच काळ बाहेर असताना आता Rishabh Pant सुद्धा याच परिस्थितीचा सामना करताना दिसत आहे.    

सायली पाटील | Updated: Apr 26, 2023, 12:22 PM IST
ऋषभ पंत ची साडेसाती संपेना; आता ICC World Cup 2023 मध्येही सहभाग अशक्य  title=
Rishabh Pant will not play ICC World Cup 2023 says reports

Rishabh Pant Ruled Out From ODI WC 2023: भारतीय क्रिकेट (Indian Cricket team) विश्वामध्ये गेल्या वर्षभरात बरेच मोठे आणि लक्षवेधी बदल झाल्याचं पाहायला मिळालं. कुठे संघातून अनुभवी खेळाडूंना दुखापतीमुळं बाहेर थांबावं लागलं, तर कुठे ज्या खेळाडूंकडून संघाला बऱ्याच अपेक्षा होत्या त्यांनाही अडचणींचा सामना करावा लागला. ऋषभ पंत हे त्यातलंच एक नाव. 2022 या वर्षअखेरीस ऋषभचा भीषण अपघात झाला. अपघात इतका मोठा होता, की चार महिन्यांचा काळ लोटूनही आतापर्यंत हा खेळाडू त्यातून पूर्णपणे सावरु शकलेला नाही. 

किंबहुना नुकतंच सूत्रांचा हवाला देत Cricbuzz  या संकेतस्थळानं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार संघात (wicketkeeper) यष्टीरक्षक- फलंदाज अशी दुहेरी भूमिका बजावणारा ऋषभ यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ICC 50-over World Cup 2023 मध्ये खेळू शकणार नाहीये. 

Kevin Pietersen: ना साई ना भरत, केपी म्हणतो 'हा' खेळाडू घेणार Rishabh Pant ची जागा!

2024 मधील जानेवारीपर्यंत तरी ऋषभ क्रिकेटच्या मैदानावर परतणार नाहीये. ज्यामुळं त्याचं नाव सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या Asia Cup 2023 मधील यादीतही नाहीये. शिवाय त्यामागोमाग असणाऱ्या क्रिकेट विश्वचषकामध्येही पंतचा सहभाग नसेल अशी निराशाजनक माहिती समोर आली आहे. 

आयपीएलच्या सामन्यात पंतची हजेरी... 

क्रिकेटच्या मैदानावर पंत इतक्यात सक्रिय होणार नसला तरीही त्यानं हल्लीच नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हजेरी लावली होती. दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्याच्या वेळी पंत मैदानात येताच क्रिकेटप्रेमींनी एकच कल्ला करत त्याचं स्वागत केल्याचं पाहायला मिळालं होतं. 

नेमका कधीपर्यंत पूर्णपणे बरा होणार ऋषभ पंत? 

सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला पंत अपेक्षित वेळापेक्षाही कमी कालावधीतच सुधारणा दाखवत आहे. पण, त्याला दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यास किमान सात ते आठ महिने लागू शकतात. ज्यामुळं तूर्तास तो भारतीय क्रिकेट संघात परतणार नाहीये हेच खरं. 

दरम्यान, अपघातापूर्वीच्या त्याच्या आकडेवारीवर लक्ष घातल्यास 25 वर्षीय पंत आतापर्यंत त्यानं 106 च्या स्ट्राईक रेटनं 865 धावा केल्या आहे.  30 सामन्यांमध्ये त्यानं 1 शतक आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. तर, 33 कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 2271 धावा केल्या असून इथं त्यानं 43.67 च्या सरासरीनं 5 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत.