मुंबई : इंग्लंडमध्ये होणारा क्रिकेट वर्ल्ड कप आता फक्त ३ महिन्यांवर येऊन ठेपला आहे. ३० मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. हा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय टीम प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतरही भारतीय बॅटिंगचा क्रम अजूनही निश्चित नाही. चौथ्या क्रमांकावर कोण बॅटिंग करणार याबद्दल अजून प्रश्नचिन्ह आहे. त्यातच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आणखी संशय वाढवला आहे. ऋषभ पंत, विजय शंकर आणि अजिंक्य रहाणे वर्ल्ड कपसाठीच्या भारतीय टीमच्या शर्यतीत असल्याचं वक्तव्य प्रसाद यांनी केलं आहे.
ऋषभ पंतनं शानदार कामगिरी करुन भारतीय निवड समितीची अडचण वाढवली आहे, असं एमएसके प्रसाद यांनी मान्य केलं. तसंच विजय शंकरच्या बॅटिंगनं वर्ल्ड कपसाठी निवडण्यात येणाऱ्या टीमला नवीन आयाम दिला आहे. विजय शंकरनं न्यूझीलंडविरुद्धच्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये ८४ रन केल्या होत्या. ऋषभ पंतनं एवढ्याच मॅचमध्ये ८० रन तर रोहित शर्मानं ८९ रन केल्या.
क्रिकइन्फोनं एमएसके प्रसाद यांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार 'ऋषभ पंत हा वर्ल्ड कपच्या शर्यतीत आहे. त्यानं निवड समितीची डोकेदुखी वाढवली आहे. ही चांगली गोष्ट आहे. मागच्या एक वर्षात पंतची कामगिरी सर्वोत्तम झाली. त्याला आणखी परिपक्व करण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही पंतला भारत ए साठी शक्य असलेल्या प्रत्येक सीरिजमध्ये सामील केलं', असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. वर्ल्ड कपसाठी विकेट कीपर असलेल्या पंतची बॅट्समन म्हणूनही निवड होऊ शकते. सध्या भारतीय टीममध्ये धोनी आणि कार्तिक हे दोन विकेट कीपर आहेत.
विजय शंकरनं केलेल्या कामगिरीचंही एमएसके प्रसाद यांनी कौतुक केलं आहे. 'विजय शंकरला जेवढी संधी मिळाली, त्याचा फायदा त्यानं करून घेतला. विजय शंकरनं आपल्याकडे या आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट खेळण्याची क्षमता असल्याचं दाखवून दिलं. मागच्या २ वर्षांपासून भारत ए टीमच्या माध्यमातून वेगवेगळ्या दौऱ्यांमधून आम्ही चांगले क्रिकेटपटू बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण हे खेळाडू टीममध्ये फिट कसे होतील, ते आम्हाला पाहावं लागेल', असं प्रसाद म्हणाले.
अजिंक्य रहाणेच्या कामगिरीवरही प्रसाद यांनी भाष्य केलं. 'स्थानिक क्रिकेटमध्ये अजिंक्य रहाणेनं चांगली कामगिरी केली आहे. वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये अजिंक्य रहाणेचा समावेश होऊ शकतो', अशी प्रतिक्रिया प्रसाद यांनी दिली. अजिंक्य रहाणेनं भारतासाठी ९० वनडे मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं ३५.२६ च्या सरासरीनं २,९६२ रन केल्या आहेत. रहाणेला २०१६-१७ सालामध्ये चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम मानण्यात येत होतं. पण २०१८ साली त्याला जास्त संधी मिळाली नाही. रहाणेनं भारताकडून शेवटची वनडे ६ फेब्रुवारी २०१८ साली खेळली.
एमएसके प्रसाद यांनी घेतलेली तिन्ही नावं चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करणारे प्रमुख दावेदार आहेत. पहिल्या तीन क्रमांकावर रोहित, शिखर आणि विराट आणि पाचव्या क्रमांकावर धोनीचं स्थान निश्चित आहे. सहाव्या क्रमांकावर केदार जाधव किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. यामुळे ऋषभ पंत, विजय शंकर आणि अजिंक्य रहाणे यांच्यापैकी एकाला जरी संधी मिळाली तर त्यांचा चौथ्या क्रमांकासाठी विचार केला जाऊ शकतो. या सगळ्यामुळे अंबाती रायुडू विषयी मात्र प्रश्न उपस्थित होत आहेत. गेल्या वर्षभरात अंबाती रायुडूनं चांगली कामगिरी केली आहे.