ऋषभ पंतनं धोनीला टाकलं मागे, द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला.

Updated: Oct 14, 2018, 06:19 PM IST
ऋषभ पंतनं धोनीला टाकलं मागे, द्रविडच्या रेकॉर्डशी बरोबरी title=

हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा १० विकेटनं विजय झाला. याबरोबरच भारतानं २ टेस्ट मॅचची ही सीरिज २-०नं जिंकली. या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये ऋषभ पंतला २ वेळा बॅटिंग मिळाली. या दोन्ही इनिंगमध्ये पंतनं ९२-९२ रन केले. या दोन्ही वेळा पंतला शतक बनवता आलं नसलं तरी त्यानं धोनीला मागे टाकलं आहे. हैदराबाद टेस्टमध्ये शेनन गॅब्रियलनं ऋषभ पंतला ९२ रनवर आऊट केलं. आत्तापर्यंत खेळेलेल्या ५ टेस्ट मॅचमध्ये पंतनं ३४६ रन केले आहेत.

धोनीनं त्याच्या पहिल्या ५ टेस्टमध्ये २९७ रन केले होते. या ५ टेस्ट मॅचमध्ये धोनीचा सर्वाधिक स्कोअर १४८ होता. तर ऋषभ पंतचा सर्वाधिक स्कोअर ११४ रन आहे. ऋषभ पंतनं २ अर्धशतकंही केली आहेत. जर तो दोनवेळा ९२ रनवर आऊट झाला नसता तर त्याच्या नावावर आता ३ शतकं असती. राजकोट आणि हैदराबाद टेस्टमध्ये पंत ९२-९२ रनवर आऊट झाला.

लागोपाठ २ इनिंगमध्ये नव्वदीमध्ये आऊट होणारा पंत दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी राहुल द्रविडच्या नावावर हे रेकॉर्ड होतं. द्रविडनं १९९७ साली श्रीलंकेविरुद्ध ९२ आणि ९३ रनची खेळी केली होती. ऋषभ पंत आणि एमएस धोनी हे दोनच विकेट कीपर आहेत जे टेस्टमध्ये २ वेळा ९२ रनवर आऊट झाले.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी पंत ८५ रनवर नाबाद होता. भारताचा स्कोअर १६२ रनवर ४ होता आणि टीम संकटात होती. पण रहाणे आणि पंतनं भारतीय टीमला सावरलं आणि महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.