मुंबई : मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला आणि आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळलेल्या रिंकू सिंग याचं बीसीसीआयने निलंबन केलं आहे. रिंकू सिंग यांच्यावर तीन महिन्यांसाठी कारवाई करण्यात आली आहे. यामुळे भारत ए आणि श्रीलंका ए यांच्यातल्या दुसऱ्या चार दिवसांच्या मॅचमधून रिंकू सिंगला डच्चू देण्यात आला. अबू धाबीमध्ये झालेल्या अनधिकृत टी-२० लीगमध्ये रिंकू सिंग सहभागी झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं. १ जूनपासून ३ महिने रिंकू सिंग क्रिकेट खेळू शकणार नाही.
बीसीसीआयने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, 'रिंकू सिंग याने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बीसीसीआयची परवानगी घेतली नाही. हा बीसीसीआयच्या नियमांचा भंग आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार बोर्डाशी नोंदणीकृत खेळाडू परवानगीशिवाय कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे रिंकू सिंग याचं ३ महिन्यांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.'
२१ वर्षांचा रिंकू सिंग १९ प्रथम श्रेणी आणि २४ लिस्ट ए सामने खेळला आहे. याशिवाय रिंकू सिंग ४७ टी-२० सामन्यांमध्ये खेळला यामध्ये ९ आयपीएल मॅचचा समावेश आहे.