Shane Warne Death : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू आणि महान लेग स्पिनर शेन वॉर्नचं (Shane Warne) अकाली निधन झालं. शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शेन वॉर्नचा सहकारी असलेल्या रिकी पॉण्टिंगने (Ricky Ponting) शेन वॉर्नच्या निधनाने आपल्या मोठा धक्का बसल्याचं म्हटलं आहे.
रिकी पाँटिंगने शेन वॉर्नच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला, क्रिकेट जगतातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक म्हणून त्याचे वर्णन केले. 52 वर्षीय शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो त्याच्या मित्रांसह थायलंडमधील व्हिलामध्ये राहत होता.
रिकी पॉण्टिंग म्हणाला की, शेन वॉर्नच्या निधनाची बातमी ऐकून मी सुन्न झालो आहे, मला विश्वास बसत नाहीए, मी सकाळी उठलो, मला मुलीला नेटबॉलसाठी घेऊन जायचं होतं, पण जेव्ही ही बातमी मी ऐकली तेव्हा मला मोठा धक्का बसला.' हे सांगताना रिकी पॉण्टिंगला आपले अश्रू रोखता आले नाहीत.
ऑस्ट्रेलियाच्या (Australia) क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक तरूण क्रिकेटपटूला लेग स्पिनर व्हायचं होतं. शेन वॉर्नने स्पिन बॉलिंगमध्ये क्रांती केली केली.' असं पॉन्टिंगने म्हटलं आहे.
पॉण्टिंगने सांगितला तो किस्सा
शेन वॉर्नला जेव्हा पहिल्यांदा भेटलो जेव्हा मी 15 वर्षांचा होतो. आम्ही एक दशकाहून अधिक काळ एकत्र खेळलो. 1990 मध्ये जेव्हा आम्ही अकादमीमध्ये क्रिकेट खेळत होतो तेव्हा आम्हाला महिन्याला 40 डॉलर मिळत होते. मी कुत्र्यांच्या शर्यतीवर पैसे खर्च करायचो. तेव्हा शेन वॉर्नने माझे नाव 'पंटर' असं ठेवलं.
क्रिकेट इतिसाताली प्रभावशाली क्रिकेटपटू
शेन वॉर्न हा क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटू होता. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर दबदबा निर्माण केला होता. वेगवान गोलंदाजांच्या काळात शेन वॉर्नने फिरकी गोलंदाजीवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं. 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत 700 पेक्षा जास्त कसोटी बळी घेणारा तो पहिला गोलंदाज होता. 1999 मध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचाही तो भाग होता.
माजी फिरकीपटू शेन वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 708 कसोटी विकेट घेतल्या तर एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 293 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (1347) च्या नंतर सर्वाधिक विकेट शेन वॉर्नच्या नावावर होत्या.