क्रिकेटमध्येही Red Card! ...तर कॅप्टन समोरच्या संघातील खेळाडूला बाहेर काढणार; जाणून घ्या नवा नियम

Red Card Rule In Cricket: आतापर्यंत तुम्ही फुटबॉल किंवा इतरही अन्य खेळांमध्ये रेड कार्डचा नियम पाहिला असेल. मात्र आता काही दिवसांमध्ये हा नियम चक्क क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे रेड कार्ड दाखवल्यावर एका खेळाडूला मैदानाबाहेर जावं लागणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 13, 2023, 10:57 AM IST
क्रिकेटमध्येही Red Card! ...तर कॅप्टन समोरच्या संघातील खेळाडूला बाहेर काढणार; जाणून घ्या नवा नियम title=
काही दिवसांमध्येच हे सामने सुरु होणार आहेत

Red Card Rule In Cricket: फुटबॉलप्रमाणेच अनेक खेळांमध्ये सामना सुरु असतानाच खेळाडूने मोठी चूक केली तर रेड कार्ड दाखवून खेळाडूला मैदानाबाहेर पाठवलं जातं. आता हीच पद्धत लवकरच क्रिकेटच्या मैदानातही दिसून येणार आहे. क्रिकेटच्या मैदानातही आता फुटबॉप्रमाणे खेळाडूंनी गंभीर चूक केली, गैरवर्तन केलं तर रेड कार्ड दाखवलं जाणार आहे. रेड कार्ड दाखवलेल्या खेळाडूला तात्काळ मैदान सोडावं लागेल. या क्रिकेटमधील रेड कार्डची सुरुवात कॅरेबियन प्रीमिअर लीगच्या यंदाच्या पर्वापासून म्हणजेच सीपीएल 2023 पासून होणार आहे. सीपीएल 2023 मध्ये रेड कार्ड वापरण्याचं एकमेव कारण म्हणजे स्लो ओव्हर रेट. या समस्येवर तोडगा म्हणून रेड कार्ड वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

...म्हणून लागू केला हा नियम

सीपीएल स्पर्धेचे निर्देशक मायकल हॉल यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे. "दरवर्षी टी-20 सामन्यांचा कालावधी वाढत चालला आहे ही आमच्यासाठी फार चिंतेची बाब आहे. आम्ही मालिकेआधी फ्रेंचायजी आणि सामना अधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात काळजी घेण्याबद्दल चर्चा केली. आम्हाला अपेक्षा आहे की सामन्यादरम्यान अशापद्धतीची शिक्षा देण्याची (रेड कार्ड दाखवण्याची) वेळ येणार नाही. मात्र स्लो ओव्हर रेटची समस्या दूर करायची असेल तर अशा शिक्षेची तरतूद करणं आवश्यकच आहे," असं हॉल म्हणाले.

सध्याचे नियम काय?

सध्याच्या क्रिकेटच्या नियमांप्रमाणे स्लो ओव्हर रेटसाठी सामन्याचं मानधन कापण्याशिवाय इतर कुठलीही कारवाई केली जात नाही. सध्या स्लो ओव्हर रेटसाठी जबाबदार असणाऱ्या संघाच्या कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते. मात्र यानंतरही स्लो ओव्हर रेटची समस्या दूर झालेली नाही. केवळ फ्रेंचायजी नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हीच समस्या आहे. त्यामुळेच आता कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये रेड कार्डचा वापर केला जाणार आहे.

रेड कार्डचे नियम कसे असतील?

जर 18 वी ओव्हर सुरु होण्याआधी गोलंदाजी करणाऱ्या संघाचा ओव्हर रेट हा निर्धारित रेटपेक्षा कमी असेल तर त्या संघातील एका अतिरिक्त खेळाडूला 30 यार्डाच्या सर्कलच्या आत उभं रहावं लागेल. म्हणजेच 4 ऐवजी 5 खेळाडू 30 यार्डाच्या सर्कलच्या आत उभे असतील. जर 19 व्या ओव्हरमध्येही स्लो ओव्हर रेट कायम असेल तर 2 खेळाडूंना 30 यार्डाच्या सर्कलच्या आत उभं रहावं लागेल. म्हणजेच 4 ऐवजी 6 खेळाडूंना 30 यार्डाच्या आत उभं रहावं लागेल. 

समोरचा कॅप्टन सांगणार कोणाला बाहेर काढायचं

पहिल्यांदा गोलंदाजी करणारा संघ शेवटी ओव्हर टाकण्याआधी निर्धारित ओव्हर रेटपेक्षा मागे असेल तर त्यांच्या एका खेळाडूला मैदान सोडावं लागेल. रेड कार्ड दाखवून एका खेळाडूला बाहेर काढण्यास सांगितलं जाईल. म्हणजेच शेवटच्या ओव्हरला जेव्हा चांगल्या फिल्डींग गरज असते तेव्हाच मैदानात केवळ 10 खेळाडू असतील. त्यातही एक गोलंदाज आणि विकेटकीपर म्हणजेच 8 खेळाडूंना संपूर्ण मैदान कव्हर करण्याचं आव्हान असेल आणि त्यातही 6 खेळाडू 30 यार्डाच्या आत असतील. विशेष म्हणजे गोलंदाजी करणाऱ्या संघातील कोणत्या खेळाडूला मैदानाबाहेर काढायचं हे फलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार ठरवणार आहे.

फलंदाजी करणाऱ्या संघालाही शिक्षा

सीपीएलमध्ये केवळ गोलंदाजी करणाऱ्या संघालाच शिक्षा होणार असं नाही तर फलंदाजी करणाऱ्या संघासाठीही नियम तयार करण्यात आला आहे. फलंदाजी करणाऱ्या संघावरही ओव्हर रेट नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी असेल. अनेकदा टी-20 सामना अधिक काळ सुरु राहण्यामागे फलंदाजी करणाऱ्या संघाने वाया घालवलेला वेळही कारणीभूत असतो. मात्र असं होणार नाही. फलंदाजी करणारा संघ मुद्दाम वेळ वाया घालवत असेल तर पंच त्यांना अंतिम इशारा देतील. त्यानंतर वेळ वाया घालवल्यामुळे 5 अतिरिक्त धावा समोरच्या संघाला दिल्या जातील. 

किती वेळात संपवावा लागणार सामना?

नव्या नियमांनुसार एक डाव संघांना 85 मिनिटांमध्ये संपवावा लागेल. यामध्ये 17 वी ओव्हर 72 मिनिटं 15 सेकंदात, 18 वी ओव्हर 76 मिनिटं 30 सेंकदात, 19 वी ओव्हर 80 मिनिटं 45 सेकंद आणि 20 वी ओव्हर 85 व्या मिनिटामध्ये संपवणं बंधनकारक अशणार आहे. तिसरे पंचही यावर नजर ठेऊन असतील. प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या चेंडूनंतर कर्णधाराला याची माहिती दिली जाईल. तसेच स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर प्रेक्षकांना ओव्हर रेटची माहिती दिली जाईल. सीपीएलला 17 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा 31 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.