म्हणून जडेजानं केला नाही कोहलीच्या विकेटनंतर जल्लोष

चेन्नई आणि बंगळुरूच्या मॅचमध्ये धोनीच्या टीमनं शानदार बॉलिंग करत विराट कोहलीच्या टीमचा ६ विकेटनं पराभव केला. 

Updated: May 6, 2018, 04:39 PM IST
म्हणून जडेजानं केला नाही कोहलीच्या विकेटनंतर जल्लोष title=

मुंबई : चेन्नई आणि बंगळुरूच्या मॅचमध्ये धोनीच्या टीमनं शानदार बॉलिंग करत विराट कोहलीच्या टीमचा ६ विकेटनं पराभव केला. चेन्नईच्या स्पिनरनी केलेल्या कामगिरीमुळे बंगळुरूच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. आपली पहिलीच ओव्हर टाकणाऱ्या रविंद्र जडेजानं पहिल्याच बॉलवर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीला बोल्ड केलं. विराटची विकेट घेतल्यानंतर जडेजानं कोणताही जल्लोष केला नाही. जडेजाच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल नेटवर्किंगवरही तो ट्रोल झाला. यानंतर जडेजानं जल्लोष न करण्याचं कारण दिलं आहे. या मॅचमधल्या माझ्या कामगिरीनंतर मी खुश आहे. माझ्या बॉलिंगमुळे टीमला विजय मिळवता आला. नेटमध्ये केलेल्या सरावाचा टीमला फायदा झाल्याचं जडेजा म्हणाला. आपल्या कामगिरीमुळे टीम जिंकत असेल तर यापेक्षा आनंदाची कोणतीच गोष्ट असू शकत नाही, असं वक्तव्य जडेजानं केलं आहे.

म्हणून जल्लोष केला नाही

पहिल्याच बॉलवर तीदेखील विराटची विकेट मिळेल असं मला वाटलंच नव्हतं. विराटला पहिला बॉल टाकताना मी तयार नव्हतो. त्यामुळे नेमकं काय झालं ते मला कळलंच नाही म्हणून मी जल्लोष केला नाही, असं जडेजा म्हणाला. कोहलीची विकेट घेणं ही मोठी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जडेजानं दिली. विराट आणि एबी डिव्हिलियर्सची विकेट सगळ्यात महत्त्वाची होती. ३-४ विकेट गेल्या तरी हे खेळाडू त्यांचा नैसर्गिक खेळ करतात. त्यामुळे या दोघांच्या विकेटमुळे खेळ बदलला असं जडेजाला वाटतंय. 

चेन्नईच्या शानदार बॉलिंगमुळे बंगळुरूला २० ओव्हरमध्ये ९ विकेट गमावून १२७ रन करता आल्या. यानंतर चेन्नईनं १८ ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून हे आव्हान पूर्ण केलं. जडेजानं ४ ओव्हरमध्ये १८ रन देऊन ३ विकेट घेतल्या.