'माझ्या डोळ्यात पाणी होतं,' रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये झाले भावूक, 'मी पंतला रुग्णालयात पाहिलं तेव्हा तर...'

T20 World Cup: भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्या हस्ते ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा (Player of the match) पुरस्कार देण्यात आला.   

शिवराज यादव | Updated: Jun 10, 2024, 06:35 PM IST
'माझ्या डोळ्यात पाणी होतं,' रवी शास्त्री ड्रेसिंग रुममध्ये झाले भावूक, 'मी पंतला रुग्णालयात पाहिलं तेव्हा तर...' title=

T20 World Cup: भारताने पाकिस्तानचा पराभव करण्यात गोलंदाज जसप्रीत बुमराहसह विकेटकीपर ऋषभ पंतनेही मोलाचा वाटा उचलला. ऋषभ पंतने 3 महत्वाचे झेल घेत आपल्यातील उत्तम क्षेत्ररक्षकाची चुणूक दाखवून दिली. 18 महिन्यांपूर्वी ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला तेव्हा क्रिकेट खेळणं सोडूनच द्या, पण तो चालूही शकेल का याबाबत सर्वांना शंका होती. पण ऋषभ पंतने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. इतकंच नाही तर आपली सर्वोत्कृष्ट खेळी दाखवत भुवया उंचावण्यास भाग पाडत आहे. 

पाकिस्तानविरोधातील सामन्यात ऋषभ पंतने आपल्या स्फोटक फलंदाजीची झलक दाखवली. एकीकडे सर्व आघाडीचे फलंदाज अपयशी ठरत असताना दुसरीकडे ऋषभ पंत मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने 31 चेंडूत 42 धावा ठोकल्या. 

भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर रवी शास्त्री (Ravi Shastri) ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांच्या हस्ते ऋषभ पंतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा (Player of the match) पुरस्कार देण्यात आला. तीन झेल घेतल्याबद्दल ऋषभ पंतला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावेळी रवी शास्त्री यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. 

"मी अपघाताबद्दल वाचलं तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी होतं. जेव्हा मी त्याला रुग्णालयात पाहिलं तेव्हा तर स्थिती आणखीनच वाईट होती. त्यानंतर त्यावर मात करत ए-झोनमध्ये येऊन भारत-पाकिसतानसारखा मोठा सामना खेळताना पाहणं फार सुखद आहे," असं रवी शास्त्री म्हणाले.

"फलंदाजी तू किती सक्षम आहेस हे सर्वांनाच माहिती आहे. तुझ्यात तो एक्स फॅक्टर आहे. पण विकेटकिपिंग करताना ज्याप्रकारे तू वेगवान हालचाली करत आहेस त्यावरुन तू ऑपरेशननंतर किती मेहनत घेतली आहेस हे दिसत आहे. आणि केवळ स्वत:साठीच नाही, तर जगभरातील लाखो लोकांसाठी ही प्रेरणा आहे की संकटातून आणि मृत्यूच्या जबड्यातून, तुम्ही विजय देखील हिरावून घेऊ शकता. खूप छान, विलक्षण. आज तुम्ही सर्वांनी चांगली खेळी केली".

पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला दुसऱ्याच ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर विराट कोहलीच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर पुढल्याच ओव्हरला रोहित शर्मा संघाची धावसंख्या 19 वर असताना तंबूत परतला. ऋषभ पंत आणि अक्सर पटेलने 39 धावांची पार्टनरशीप केली. मात्र पटेलही संघाची धावसंख्या 58 वर असताना बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सूर्यकुमार यादवही फारकाळ मैदानावर टीकला नाही. 12 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या 89 वर असताना चौथी विकेट सूर्यकुमार यादवच्या रुपाता पडली. त्यानंतर स्कोअरबोर्ड 95 वर असताना शिवम दुबे तंबूत परतला. संघाची धावसंख्या 96 वर असतानाच पंत तंबूत परतला. पहिल्याच बॉलवर भोपळाही न फोडता रविंद्र जडेजा झेलबाद झाला. 7 धावांची भर घालून हार्दिक पंड्या 112 वर स्कोअरबोर्ड असताना तंबूत परतला. धावसंख्येत एकाही रनची भर न घालता बुमरहालाही आला तसाच परतला. तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर अर्शदीप आणि मोहम्मद सिराजने केलेल्या 7 धावांची पार्टरनशीप केली.

20 ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूमागे एक धाव इतक्या माफक अशा 120 धावांचं आव्हान पाकिस्तान सहज गाठेल असं वाटतं होतं. धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघ हा सामना जिंकणार असं चित्र दिसत होतं. अगदी 48 बॉलमध्ये 48 धावा हव्या असताना पाकिस्तानच्या हाती 8 विकेट्स होत्या. मात्र भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार पुनरागमन करत पाकिस्तानी संघाची दाणादाण उडवली. या दोघांनी केलेल्या अचूक माऱ्यासमोर पाकिस्तानी संघ खेळपट्टीवर टीकलाच नाही.