पांड्या-पुजाराच्या या चुकीवर भडकला रवी शास्त्री

भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्यावर चांगलाच भडकला आहे.

Updated: Jan 22, 2018, 08:48 PM IST
पांड्या-पुजाराच्या या चुकीवर भडकला रवी शास्त्री  title=

जोहान्सबर्ग : भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्यावर चांगलाच भडकला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या केप टाऊन आणि सेंच्युरिअन टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे भारतानं टेस्ट सीरिजही गमावली. तीन टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-०नं पिछाडीवर आहे. सीरिजची तिसरी टेस्ट २४ जानेवारीपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येईल.

सेंच्युरिअन टेस्टमध्ये पुजारा दोन्ही इनिंगमध्ये तर हार्दिक पांड्या पहिल्या इनिंगमध्ये निष्काळजीपणामुळे रन आऊट झाले होते. तिसऱ्या टेस्टआधी जोहान्सबर्गमध्ये झालेल्या सरावानंतर शास्त्रीनं हार्दिक पांड्या आणि पुजारावर निशाणा साधला. दक्षिण आफ्रिकेतली परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल नाही. अशावेळी तुम्ही रन आऊट झालात तर वाईट वाटतं. शाळेतल्या मुलांसारख्या या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, असे कठोर शब्द शास्त्रीनं वापरले आहेत.

मागच्या दोन्ही मॅचमध्ये भारताकडे विजय मिळवण्याची संधी होती पण खेळाडूंनी या संधीचा फायदा उचलला नाही, असं शास्त्री म्हणाला. मॅचमध्ये खेळणाऱ्या ११ खेळाडूंच्या निवडीवरून शास्त्रीनं कोहलीची पाठराखण केली आहे. खेळाडूंची निवड मॅचची स्थिती आणि खेळाडूंचा फॉर्म पाहून करण्यात येते, असं वक्तव्य शास्त्रीनं केलंय.