मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी दारुण पराभव झाला. या पराभवामुळे भारत ५ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये २-०नं पिछाडीवर आहे. या पराभवानंतर भारतीय टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्रीवर जोरदार टीका होत आहे. रवी शास्त्री हा ग्रेग चॅपलपेक्षाही धोकादायक आहे. ग्रेग चॅपल प्रशिक्षक असताना भारतीय क्रिकेटचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा जास्त नुकसान शास्त्रीमुळे होईल, अशी चिंता क्रिकेट रसिकांनी व्यक्त केली आहे. एकीकडे रवी शास्त्रीवर अशाप्रकारे टीका होत असताना भारतीय ए टीम आणि अंडर १९ टीमचा प्रशिक्षक राहुल द्रविडनं वेगळाच आदर्श घालून दिला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं राहुल द्रविडचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये भारतीय ए टीमचे खेळाडू पुढच्या रांगेत बसले आहेत. तर राहुल द्रविड मागच्या रांगेमध्ये उभा आहे. माझे रणजी आणि भारतीय ए टीमचे प्रशिक्षक नेहमी पुढच्या रांगेत बसायचे. पण राहुल द्रविड मागच्या रांगेत उभा आहे. सन्मान... सगळ्यात पहिले खेळाडू... महान... अशी पोस्ट आकाश चोप्रानं शेअर केली आहे.
राहुल द्रविडचे पाय अजूनही जमिनीवर आहेत याचं हे काही पहिलं उदाहरण नाही. राहुल द्रविड प्रशिक्षक असताना भारतानं चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला. यानंतर बीसीसीआयनं प्रमुख प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक आणि खेळाडूंना बक्षीस जाहीर केलं. पण सहाय्यक प्रशिक्षकांना राहुल द्रविडपेक्षा कमी रक्कम बक्षीस मिळाल्यामुळे द्रविड नाराज झाला. बीसीसीआयनं राहुल द्रविडला ५० लाख, सहाय्यकांना ३० लाख आणि खेळाडूंना ३० लाख रुपयांचं बक्षीस दिलं होतं. पण राहुल द्रविडनं नाराजी व्यक्त केल्यानंतर सगळ्यांना समान बक्षीस देण्यात आलं.
आयपीएल २०१८मध्ये बंगळुरू आणि कोलकात्याच्या मॅचमध्ये राहुल द्रविडनं प्रेक्षकांमध्ये बसूनच मॅच बघितली. राहुल द्रविड बंगळुरूच्या टीमचा पहिला कर्णधार होता. पण त्यानं मॅच बघताना कोणतीही व्हीआयपी ट्रिटमेंट नाकारली.
मागच्या वर्षी राहुल द्रविड त्याच्या मुलाबरोबर विज्ञानाचं प्रदर्शन बघायला गेला होता. त्यावेळी तो मुलाबरोबर रांगेमध्ये उभा होता. राहुल द्रविडचा फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला होता.
That's Rahul Dravid in a queue with his kids at a science exibhition.
No show off;
no page 3 attitude;
no celebrity airs;
no "do you know who I am?" looks;
Queueing just like any other normal parent... really admirable... pic.twitter.com/NFYMuDqubE— South Canara (@in_southcanara) November 23, 2017