पुलवामा हल्ला : मोहाली स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवले

पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.

Updated: Feb 17, 2019, 08:58 PM IST
पुलवामा हल्ला : मोहाली स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवले title=

चंडीगड : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन (पीसीए)नं मोहालीतल्या स्टेडियममधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढून टाकले आहेत. पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी पीसीएनं हा निर्णय घेतला आहे. पीसीएचे खजीनदार अजय त्यागी यांनी पीटीआयला याबद्दल माहिती दिली.

'शहिद जवानांच्या कुटुंबाला पाठिंबा म्हणून आम्ही मोहालीच्या स्टेडियममधल्या पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो काढण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीयांमध्ये ज्याप्रमाणे संताप आहे, तसाच संताप आमचाही आहे,' असं अजय त्यागी म्हणाले.

पीटीआयशी बोलताना अजय त्यागी यांनी सांगितलं, 'मोहालीच्या स्टेडियममधल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानच्या १५ खेळाडूंचे फोटो होते. गॅलरी, लॉन्ग रूम, रिसेप्शन आणि हॉल ऑफ फेम, या भागांमध्ये आम्ही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो लावले होते.'

मोहालीच्या याच मैदानात भारत-पाकिस्तानमध्ये २०११ सालच्या वर्ल्ड कपची सेमी फायनल खेळवण्यात आली होती. भारताच्या टीमनं त्यावेळी शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वातल्या पाकिस्तानचा पराभव करत फायनल गाठली होती.

मोहालीच्या या स्टेडियममध्ये सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचाही फोटो होता. इम्रान खान यांच्याबरोबरच शाहिद आफ्रिदी, वसीम अक्रम, जावेद मियांदाद यांचे फोटोही मोहालीच्या स्टेडियममधून हटवण्यात आले आहेत.

सीसीआयनंही फोटो काढले

मुंबईतील जुन्या क्रिकेट क्लबपैकी एक असलेल्या क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने क्लबच्या राऊंड रुममध्ये लावलेला क्रिकेटपटू इम्रान खान यांचा फोटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा इथे झालेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सीसीआयने हा निर्णय घेतला आहे. इम्रान खानच्या फोटोऐवजी याठिकाणी आता क्रिकेटपटू विनोद मंकड यांचा फोटो लावण्यात येणार आहे.