Pakistan Super League Viral Video: पाकिस्तान सुपर लीगमध्ये सोमवारी पेशावर झालिम आणि कराची नाईट्समध्ये झालेल्या सामन्यात कराचीच्या संघाला मोठा धक्का बसला. 148 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना कराची नाईट्सचा संघ 2 धावांनी पराभूत झाला. बाबर आझमने या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. पेशावरच्या संघाने 147 धावापर्यंत मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम शेफर्टने 30 बॉलमध्ये 41 धावा करत उत्तम सुरुवात करुन दिल्यानंतरही कराचीच्या संघाला लक्ष्य गाठता आलं नाही.
कराचीच्या संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केली. पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने 25 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. शोएबला अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकने बोल्ड केलं. शोएब मलिकची विकेट पाहून त्याची तिसरी पत्नी साना जावेदचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. शोएबच्या विकेटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
साना जावेद नेहमीप्रमाणे पतीच्या संघाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मैदानात हजर होती. 18 बॉलमध्ये कराचीला 31 धावांची गरज होती. त्यावेळेस शोएब 24 बॉलमध्ये 22 धावा करुन खेळत होता. तो सामना जिंकवून देईल अशी कराचीच्या चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मोठा फटका मारण्याच्या नादात नवीन-उल-हकच्या बॉलवर शोएब बोल्ड झाला. शोएब बोल्ड झाल्यानंतर सानाच्या चेहऱ्यावरील रंग उडल्याचा क्षण कॅमेरात अचूक टीपला गेला. नवीन-उल-हक विराट कोहलीबरोबरच्या वादामुळे चर्चेत आला होता. अर्थात या दोघांमधील हा वाद मैदानात सुरु होऊन काही महिन्यांनी मैदानातच संपला.
Off stump goes cartwheeling!
Naveen gets rid of Malik #HBLPSL9 I #KhulKeKhel I #KKvPZ pic.twitter.com/dpw5bMrrgl
— PakistanSuperLeague (@thePSLt20) March 11, 2024
जानेवारी महिन्यामध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या कुटुंबाने शोएब मलिकपासून सानिया विभक्त झाल्याची घोषणा केली. शोएब मलिकने या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या तिसऱ्या लग्नाची घोषणा सोशल नेटवर्किंगवरुन केली. शोएबने अभिनेत्री साना जावेदबरोबर आपण निकाह केल्याचं जाहीर केलं. याचबरोबर भारत आणि पाकिस्तानी क्रिडा चाहत्यांमध्ये मागील दीड दशकांपासून नेहमी चर्चेत असलेली सानिया आणि शोएबची जोडी विभक्त झाल्याच्या वृत्तावर शिक्कमोतर्ब झालं. 41 वर्षीय शोएब मलिकने यानंतर पत्नी सानाबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. "सानियाने कायमच तिच्या आयुष्यातील खासगी गोष्टी सार्वजनिक होणार नाहीत याची काळजी घेतली. मात्र आज ती आणि शोएब काही महिन्यांपूर्वीच घटस्फोट घेऊन विभक्त झाल्याचं सांगणं गरजेचं आहे. शोएबला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा," असं सानियाच्या कुटुंबाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं होतं. "सानियाच्या आयुष्यातील या नाजूक काळात सर्व चाहत्यांकडून आणि शुभचिंतकांकडून तिच्यासंदर्भात कोणत्याही अफवा न पसरवण्याची आम्ही अपेक्षा करोत. तसेच या काळात तिला तिचं खासगी आयुष्य जपण्यासाठी आणि सावरण्यासाठी वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो," असंही कुटुंबाने म्हटलं होतं.
सानिया आणि शोएब यांचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. हैदराबादमध्ये दोघेही विवाहबंधनात अडकले होते. मात्र मागील काही वर्षांपासून दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. शोएबने अचानक 37 वर्षीय सानियाला अनफॉलो केल्याने दोघांचं नातं संपुष्टात आल्याची जोरदार चर्चा होती. यावर नंतर शिक्कामोर्तब झालं. सध्या या दोघांचा पाच वर्षांचा इझान नावाचा मुलगा सानियाबरोबर वास्तव्यास आहे.