Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायक

Puneri Paltan VS Telugu Titans:  तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 10, 2024, 06:39 AM IST
 Pro Kabaddi League: तेलुगु टायटन्सने केली पुणेरी पलटणवर मात, बोनस गुण ठरले निर्णायक title=

PKL 11: विजय मलिकने कौशल्यपूर्ण चढाईत वसूल केलेल्या ८ बोनस गुणांच्या जोरावर अखेरच्या सेकंदापर्यंत श्वास रोखून धरायला लावलेल्या सामन्यात तेलुगु टायटन्सने गुणतक्त्यात आघाडीवर असणाऱ्या पुणेरी पलटणचा ३४-३३ असा एका गुणाने पराभव केला. प्रो कबड्डीच्या ११व्या पर्वातील घरच्या मैदानावरील मोहिमेची सांगता तेलुगु टाययन्सने विजयाने केले. या विजयासह तेलुगु टायटन्स गुणतालिकेत पलटणपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आले आहे.

सामन्यातील पूर्वार्ध जेवढा रंगतदार झाला, तेवढा सामन्याच्या उत्तरार्धातील अखेरची दोन मिनिटे श्वास रोखून धरायला लावणारी ठरली. बचावाच्या आघाडीवर दोन्ही संघांना फारसे यश मिळाले नसले, तरी दोन्ही संघाच्या चढाईपटूंनी निर्विवाद वर्चस्व राखले. पुर्वार्धातच गुडघ्यात चमक आल्याने पुणेरी पलटणचा कर्णधार अस्लम इनामदारला बाहेर जावे लागले. याचा पलटणच्या खेळावर जरुर परिणाम झाला. त्याची उणिव पंकज मोहितने भरुन काढली. त्याने ९ गुणांची कमाई केली. पण, त्याला अन्य चढाईपटूंकडून तेवढी साथ मिळाली नाही. तुलनेने तेलुगु टायटन्सकडून पवन सेहरावत (१२) आणि विजय मलिक (१३) या दोघांच्या सुपर टेनने तेलुगुचा विजय साकार केला. एरवी भक्कम बचावाच्या बळावर खेळणाऱ्या पुणेरी पलटणच्या गौरव खत्री आणि अमन या कोपरारक्षकांना आज एकाही गुणाची नोंद करता आली नाही. 

पूर्वार्धातील सामन्याचा वेग लक्षात घेतल्यावर उत्तरार्धात असाच खेळ बघायला मिळणार असे वाटत होते. मात्र, दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला. त्यामुळे उत्तरार्धातील पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ गुणांची कमाई केल्याने गुणफलक २४-२४ अशीच बरोबरी दाखवत होता. अखेरच्या दहा मिनिटांत पुन्हा एकदा चढाईपटूंच्या कौशल्यांचा कस लागला. पंकज मोहितेला या वेळी व्ही अजित कुमारच्या चढायांची साथ मिळाली. मात्र, विजय मलिकने केलेल्या खोलवर चढाया अधिक लक्षात राहिल्या. पलटण संघाने २९-२८ अशी एका गुणाची आघाडी कायम राखली होती. त्याच क्षणाला तेलुगु टायटन्सच्या अंगणात केवळ दोन खेळाडू होते. तेलुगुवर लोणचे संकट होते. तेव्हा विजयची पकड करण्याची चूक मोहित गोयतने केली आणि पुणेरी पलटणला एक गुण गमवावा लागला. त्यानंतर २९-२९ अशा बरोबरीत पुन्हा एकदा पंकजने चढाईत गुण मिळवत २९-३० अशी आघाडी पलटणकडे आली. या वेळी पुन्हा एकदा विजय मलिकने आपल्या चढाईत बोनससह एक गुण मिळवत आघाडीचे चित्र ३१-३० असे पालटवले. मात्र, अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना तिसऱ्या वेळेस विजय मलिक ती जादू दाखवू शकला नाही. त्यामुळे पलटणने दुसरा लोण देत ३२-३३ अशी आघाडी मिळवली. अखेरच्या काही क्षणात सामना ३३-३३ असा बरोबरीत आला. अखेरची ४० सेकंद बाकी असताना डू ऑर डाय चढाईत अजित कुमारला तेलुगुच्या अजितने डॅश देत बाहेर काढले आणि ३४-३३ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pro Kabaddi (@prokabaddi)

कसं झालं पाहिलं सत्र?

पहिल्या सत्रात  पुणेरी पलटणसाठी पंकज मोहिते आणि तेलुगु टायटन्ससाठी पवन सेहरावत यांच्या चढाया असाच खेळ झाला. बचावाच्या आघाडीवर एक पाऊल पुणेरी पलटणचे पुढे होते. पण, चढाईपटूंनी केलेल्या कौशल्यपूर्ण खेळाने सामन्याचे चित्र सतत पलटी घेत होते. तेलुगूने पहिले पाच गुण मिळविले तेव्हा पलटण संघाला आपले खातेही उघडता आले नव्हते. त्यानंतर तेलुगुने ६-१ अशी आघाडी घेत पलटणवर लोणचे संकट आणले होते. या वेळी पुन्हा अंतिम सात जणात संधी मिळालेल्या पंकज मोहितने बोनससह दोन गुण मिळवताना पलटणचे आव्हान कायम राखले. तेव्हा ६-४ अशी गुणस्थिती होती. त्यानंतर मोहित गोयतने पवन सेहरावतची अव्वल पकड करत पुणेरी पलटण संघाला ६-९ असे आघाडीवर आणले होते. या आघाडीनंतर पलटणने मागे वळून बघितले नाही. पहिली दहा मिनिटे संपत असताना पलटणने तेलुगुवर लोण चढवत १४-९ अशी आघाडी मिळवली. 

शेवटचा क्षण निर्णायक 

पूर्वार्धातील या सुरुवातीच्या १० मिनिटांत लोणची नामुष्की आल्यावर तेलुगुने पवनच्या चढायांनी जोर धरला. पूर्वार्धातच पवनने सुपर टेनची नोंद करत तेलुगुचे आव्हान राखले. सामना विश्रांतीला जात असताना तेलुगूने पलटणवर लोण देत पुन्हा एकदा सामन्यात १६-१९ अशी आघाडी मिळवली. मध्यंतराला सामना थांबला तेव्हा गुणफलक २०-२० असा बरोबरीत होता.