सचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ

सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे. 

Updated: Nov 1, 2017, 10:48 PM IST
सचिनचं रेकॉर्ड तोडण्याच्या जवळ पोहोचला पृथ्वी शॉ  title=

भुवनेश्वर : सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला मुंबईचा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ यानं पाचव्या प्रथम श्रेणी मॅचमध्ये चौथं शतक लगावलं आहे. शॉच्या शतकाच्या मदतीनं मुंबईनं ओडिसाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी ग्रुप सीच्या मॅचमध्ये पहिल्या दिवशी २६४/६ एवढा स्कोअर केला आहे.

पृथ्वी शॉनं अजिंक्य रहाणेबरोबर १३६ रन्सची पार्टनरशीप केली. रहाणेनं ४९ रन्स बनवल्या. या दोघांव्यतिरिक्त मुंबईच्या इतर कोणत्याही बॅट्समनना मोठी कामगिरी करता आली नाही. सिद्धेश लाडनं ३३ आणि सूर्यकुमार यादवनं २३ रन्सची खेळी केली, पण मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना यश आलं नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॅप्टन आदित्य तरे २८ रन्सवर नाबाद तर आकाश पारकर तीन रनवर नाबाद होते. ओडिसाच्या बसंत मोहंती आणि विपलव सामंत्रेय यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

या शतकाबरोबरच पृथ्वी शॉनं अंबती रायडूच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. रायडूनं १८ वर्षांच्या आधी ४ शतकं झळकावली होती. १८ वर्षांच्या आधी सचिन तेंडुलकरनं ८ शतकं झळकावली होती. पृथ्वी शॉ अजूनही १८ वर्षांचा झालेला नाही. पृथ्वीनं यावर्षी रणजी आणि दिलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या या दोन्ही मॅचमध्ये शॉनं शतक ठोकलं. न्यूझीलंडविरुद्धच्या बोर्ड प्रेसिडेंटकडून खेळताना ६६ रन्स केल्या होत्या.