दुबई : कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा (डीसी) 3 विकेट्सने पराभव करत आयपीएलची अंतिम फेरी गाठली, जिथे त्यांचा सामना महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जशी (CSK) होईल. एक चेंडू शिल्लक असताना राहुल त्रिपाठीच्या षटकाराच्या जोरावर कोलकाताने दिल्लीला हरवून आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. केकेआरला शेवटच्या दोन चेंडूंमध्ये सहा धावांची गरज होती आणि रविचंद्रन अश्विन बॉलिंग करत होता. या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर अश्विन हॅटट्रिकवर होता, पण त्रिपाठीने पाचव्या चेंडूला सिक्स मारुन दिल्लीचे स्वप्न भंग केले.
पृथ्वी शॉला अश्रू अनावर
कोलकाताकडून पराभवानंतर दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ भावनिक झाला. पृथ्वी शॉला अश्रू अनावर झाले. जे स्पष्ट दिसत होते. सहकारी खेळाडूंनी निराश पृथ्वी शॉला उचलले आणि त्याच्या उत्साहाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पृथ्वी शॉ ड्रेसिंग रूममध्ये एकटा रडताना दिसला. या पराभवामुळे पृथ्वी शॉ तुटला होता. पृथ्वी शॉचा सर्वात चांगला मित्र शिखर धवन पृथ्वीकडे आला आणि त्याला प्रोत्साहन दिले.
दिल्लीच्या फलंदाजांचा संघर्ष
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेले दिल्लीचे फलंदाज संथ खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले तर केकेआर गोलंदाजांनी अचूक लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली. सलामीवीर शिखर धवनने 39 चेंडूत 36 धावा केल्या तर श्रेयस अय्यर 27 चेंडूत 30 धावांवर नाबाद राहिला. चक्रवर्तीने 26 धावांत दोन बळी घेतले तर लॉकी फर्ग्युसन आणि शिवम मावी यांना प्रत्येकी एक बळी मिळाला. दिल्लीने कोलकातासमोर विजयासाठी 136 धावांचे लक्ष्य ठेवले होते. एकेकाळी असे वाटत होते की कोलकाताचा संघ हा सामना सहज जिंकेल. शेवटच्या 25 चेंडूंमध्ये कोलकाताला विजयासाठी 13 धावांची गरज होती. तोपर्यंत कोलकात्याने केवळ दोन विकेट गमावल्या होत्या.
अवेश खानने 17 व्या षटकात शुभमन गिलला बाद केले आणि दोन धावा दिल्या. त्यानंतर 18 व्या षटकात रबाडाने दिनेश कार्तिकला शून्यावर बाद केले आणि एक धाव दिली. यानंतर एनरिक नॉर्टजेने पुढील षटकात तीन धावा दिल्या आणि इऑन मॉर्गनला शून्यावर बाद केले. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी सात धावांची गरज होती. रविचंद्रन अश्विन गोलंदाजीवर होता. अश्विनने शकीब अल हसन आणि सुनील नरेनला दोन चेंडूंत शून्यावर बाद करून हॅटट्रिकची संधी साधली. शेवटच्या दोन चेंडूंमध्ये कोलकाताला विजयासाठी सहा धावांची गरज होती. राहुल त्रिपाठीने एका षटकारासह सामना संपवला.